संतश्रेष्ठ निवृत्तिनाथांची पालखी आज पंढरपुरात, सत्तावीस दिवसांचा अखंड प्रवास | पुढारी

संतश्रेष्ठ निवृत्तिनाथांची पालखी आज पंढरपुरात, सत्तावीस दिवसांचा अखंड प्रवास

त्र्यंबकेश्वर (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा

संतश्रेष्ठ निवृत्तिनाथांची पालखी मजल-दरमजल करत बुधवारी (दि. २८) पंढरपूरच्या वेशीवर वाखरीत दाखल होणार आहे. बुधवारी सकाळी ती पंढरपुरात प्रवेश करेल.

त्र्यंबकेश्वरपासून पालखीचा २७ दिवसांचा प्रवास पूर्ण झाला आहे. मंगळवारी (दि. 27) चिंचोली मुक्कामी नाथांच्या पादुकांचे चंद्रभागास्नान झाले. चंद्रभागेच्या स्पर्शाने वारकरी कृतार्थ झाले. पंढरपुरातील मंदिरांच्या गोपुरांकडे पाहून वारकऱ्यांचे डोळे भरून येत आहेत. जन्मोजन्मीचे ऋण फिटले, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. दि. 2 जून रोजी त्र्यंबकेश्वर येथून पालखीचे प्रस्थान झाले. यावर्षी पालखीत सव्वा लाखाहून अधिक वारकरी सहभागी झाले आहेत. दिंड्या पताका वैष्णव नाचती याची अनुभूती घेत आहेत. वातावरणात सुरुवातीला खूप उष्णता होती परंतु आता पाऊस सुरू झाल्याने वारकरी सुखावले आहेत. एका खासगी कंपनीने रेनकोट आणि प्लास्टिक पिशव्यांचे वाटप केले आहे.

वारकऱ्यांना उत्तम सोयीसुविधा

संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ संस्थानचे अध्यक्ष नीलेश महाराज गाढवे पाटील हे त्र्यंबकेश्वरपासून ते पंढरपूरपर्यंत दिंडीसोबत आहेत. त्यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क संवाद साधला असता, त्यांनी पालखी पंढरपूरच्या वेशीवर दाखल झाल्याचे सांगितले. पालखी प्रस्थानापूर्वी त्यांनी मुंबईत मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री यांची भेट घेऊन सुविधांची मागणी केली होती. तेव्हा केलेले प्रयत्न खरोखरच लाभदायक ठरल्याचे त्यांनी सांगितले.

सीलिंग फॅन, कार्पेट मंडप

यावर्षी प्रथमच शासनाने मोबाइल टॉयलेट सुविधा पुरवली आहे. गावोगाव पालखी मुक्काम असताना पूर्वी होणारी अस्वच्छता आता होत नाही. जवळपास 90 टक्के रस्ते चांगले झालेले आहेत. नाशिक, नगर आणि सोलपूर या तीन जिल्ह्यांमध्ये प्रशासनाने चांगले सहकार्य केले. जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार पालखीच्या स्वागतासाठी उपस्थित राहतात. सुविधांबाबत विचारपूस करतात. पालखी मुक्कामाच्या ठिकाणी सीलिंग फॅन, कार्पेट असलेले मंडप सेवेसाठी उभारल्याचे त्यांनी सांगितले.

विश्वस्तही पालखी समवेत

नीलेश गाढवे पाटील हे दिंडी मुक्कामावर सोबत असतात. सकाळी 5 ला त्यांचा दिवस सुरू होतो. पालखी प्रस्थान होते, त्यापूर्वी ते पुढच्या गावी पोहोचतात. तेथे दुपारच्या भोजनाची, रात्रीच्या मुक्कामाची, तेथील सुविधांची माहिती घेतात. सोबत असलेल्या पोलिस आणि आरोग्य पथकाचीही ते व्यवस्था करतात. नियोजनानंतर सायंकाळच्या वेळेस पुन्हा पालखीसोबत येतात. बहुतेकदा सायंकाळच्या कीर्तनाला स्वत: मृदंगाची साथ देतात. त्यांच्या समवेत सचिव ॲड. सोमनाथ घोटेकर, पालखी सोहळाप्रमुख नारायण महाराज मुठाळ, प्रसिद्धीप्रमुख अमर ठोंबरे आणि काही विश्वस्त आहेत.

तीन जुलैपासून परतीचा प्रवास

बुधवारी (दि. 28) सायंकाळी संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराज मठात संत निवृत्तिनाथांची पालखी मुक्कामाला पोहोचणार आहे. तेथे ती गुरुपौर्णिमेपर्यंत मुक्कामी राहणार आहे. 3 जुलैपासून पालखीचा परतीचा प्रवास सुरू होईल.

हेही वाचा :

Back to top button