‘पुढारी’ तर्फे उद्या एकादशीच्या मुहूर्तावर रंगणार ‘संतवाणी’ | पुढारी

'पुढारी' तर्फे उद्या एकादशीच्या मुहूर्तावर रंगणार 'संतवाणी'

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा :  ‘माझे माहेर पंढरी’पासून ते ‘ज्ञानियांचा राजा गुरू महाराव’पर्यंतचे, ज्ञानदेव-तुकोबापासून नामदेवादिकांच्या संतमंडळींचे अभंग केवळ उभ्या महाराष्ट्राच्याच नव्हे, तर विदेशातील मराठीजनांच्याही ओठी सहजी आणण्याची सुरेल कामगिरी केली भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांनी. ही अभंगवाणी अन् त्याविषयीच्या पंडितजींच्या आठवणी पंडितजींचे सुपुत्र श्रीनिवास आणि नातू विराज यांच्याकडून ऐकण्याचा योग दै. ‘पुढारी’ने येत्या आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर रसिकांसाठी जमवून आणला आहे.

आकुर्डी प्राधिकरणातील ग. दि. माडगूळकर सभागृहात आषाढी एकादशीला म्हणजे गुरुवारी दि. 29 जूनला सायंकाळी साडेपाच वाजता संतवाणीचा हा कार्यक्रम होणार असून, तो मोफत असणार आहे. पंडितजींनी विविध संतांच्या अभंगांमधील भाव आपल्या अलौकिक स्वरप्रतिभेने मराठीजनांच्या हृदयापर्यंत नेले. त्याने मराठी मन डोलू लागले, विठ्ठलनामाचा गजर करू लागले. ज्येष्ठ संगीतकार राम फाटक आणि श्रीनिवास खळे यांनी स्वरबद्ध केलेल्या या अभंगांनी महाराष्ट्राचा कानाकोपरा दुमदुमून गेला, भक्तिरसात न्हाऊन गेला.

‘अगा वैकुंठीच्या राया’, ‘अणुरेणूया थोकडा तुका आकाशाएवढा’, ‘अधिक देखणे तरी’, ‘आता कोठे धावे मन’, ‘आरंभी वंदीन अयोध्येचा राजा’, ‘कान्होबा, तुझी घोंगडी चांगली’, ‘काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल’, ‘तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल’, ‘नामाचा गजर गर्जे भीमातीर’, ‘पंढरीचा वास चंद्रभागे स्नान’, ‘पंढरी निवासा सख्या पांडुरंगा’, ‘मन रामरंगी रंगले’, ‘माझे माहेर पंढरी’, ‘सावळे सुंदर रूप मनोहर’, ‘ज्ञानियांचा राजा गुरू महाराव…’ यांसारख्या अनेक अभंगांनी मराठी मनात रुंजी घातली. तिन्ही सप्तकांत फिरणार्‍या पंडितजींच्या स्वरांनी, त्यांच्या लयबद्ध तानांनी हे अभंग जिवंत झाले.पंडितजींनी संतवाणीचे कार्यक्रम महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यांमध्ये केलेच; पण विदेशातही संतवाणी चांगलीच गाजली. या अभंगांना संगीत देताना, ते सादर करताना अनेक रंजक प्रसंग घडले. यांतील काही किस्से अजूनही रसिकांपर्यंत पोचलेले नाहीत.

पंडितजींचा वारसा लाभलेले श्रीनिवास आणि विराज हे पंडितजींनी गायलेले अभंग आकुर्डीच्या कार्यक्रमात सादर करतीलच; पण त्याचबरोबर हे किस्सेही रसिकांना ऐकवतील. विराजची गायकी ऐकल्यावर असंख्य रसिकांना पंडितजींचीच गायनशैली ऐकत असल्याचा भास होतो. ‘आजोबांचे गुण नातवात उतरलेत,’ अशी जाणत्या रसिकांची प्रतिक्रियाही मोलाची ठरते.

एकीकडे भूवरच्या वैकुंठी म्हणजेच श्री क्षेत्र पंढरपूरमध्ये आषाढी एकादशीनिमित्त वैष्णवांचा मेळा भक्तिरसात न्हात असताना पिंपरी-चिंचवडवासीयांना तसेच पुण्यातूनही आवर्जून ऐकण्यास येणार्‍या रसिकांना अभंगांच्या भावकल्लोळात डुंबता येणार आहे. ‘पुढारी’ने आयोजित केलेला हा कार्यक्रम मोफत असणार आहे. या मैफलीत सहभागी होण्याचे आवाहन ‘पुढारी’ परिवारातर्फे करण्यात येत आहे.

Back to top button