Nashik | अकरावी प्रवेशप्रक्रिया : शून्य फेरीत ६६२ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित | पुढारी

Nashik | अकरावी प्रवेशप्रक्रिया : शून्य फेरीत ६६२ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

इयत्ता अकरावीच्‍या प्रवेशप्रक्रियेंतर्गत महाविद्यालयांमधील विविध कोटांतर्गत प्रवेशासाठी राबविण्यात येणाऱ्या शून्य फेरीतील प्रवेश निश्‍चितीला विद्यार्थ्यांचा अल्‍प प्रतिसाद मिळत आहे. या फेरीत ६६२ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहे. विद्यार्थ्यांना कोटांतर्गत प्रवेशासाठी पुन्हा अर्जासाठी मंगळवारी (दि.२०) अखेरची संधी मिळणार आहे. बुधवारी (दि.२१) संबंधित महाविद्यालयांकडून गुणवत्ता यादी जाहीर केली जाईल. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना शनिवार (दि.२४)पर्यंत प्रवेश निश्चित करावा लागेल.

नाशिक मनपा हद्दीतील ६४ महाविद्यालयांत कोटांतर्गत इयत्ता अकरावीच्या ४ ,३५८ जागा उपलब्ध आहे. आतापर्यंत इन हाऊस कोट्यातील २,१४६, अल्पसंख्याक कोट्यातील १,२४० तर व्यवस्थापन कोट्यातील ९२७ जागा ऑनलाइन प्रक्रियेत समाविष्ट करण्यात आल्या आहेत. त्यापैकी ६६२ जागांवर विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत. यामध्ये सर्वाधिक ३३२ प्रवेश अल्पसंख्याक विद्यार्थ्यांचे आहेत. इन हाऊस कोट्यातील जागांवर ३२९ विद्यार्थ्यांचे, तर व्यवस्थापन कोट्यातून अवघा एक प्रवेश निश्चित झाला आहे.

दरम्यान, नियमित पहिल्या फेरीसाठी अर्ज करण्याची प्रक्रियाही पूर्ण झाली असून, २२ हजार ४६ विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज नाेंदणी केली आहे. तर १८ हजार ७८५ अर्ज लाॅक केले आहेत. १३ हजार ८६३ विद्यार्थ्यांचे अर्ज प्रमाणित झाले आहेत. १६ हजार १०२ विद्यार्थ्यांनी पसंतीक्रम नोंदवला आहे. बुधवारी (दि. २१) पहिली गुणवत्ता यादी प्रसिध्द केली जाणार आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना २४ जूनपर्यंत संबंधित महाविद्यालयांमध्ये प्रवेश निश्चित करावा लागणार आहे.

कोटांतर्गत निश्चित प्रवेश

इन हाऊस – ३२९

अल्पसंख्याक – ३३२

व्यवस्थापन – ०१

एकूण – ६६२

नियमित फेरीच्या जागा वाढणार

महाविद्यालयांमध्ये व्यवस्थापन कोटा (५ टक्के), संस्थांतर्गत कोटा (१० टक्के) आणि केवळ अल्पसंख्याक संस्थांसाठी अल्पसंख्याक कोटा (५० टक्के) अशा जागा राखीव ठेवल्या जातात. त्यासाठी स्वतंत्र प्रवेशप्रक्रिया राबविली जाते. त्यानंतर रिक्त जागा (व्यवस्थापन व संस्थांतर्गत कोटा) कॅप फेरीसाठी म्हणजे नियमित फेऱ्यांसाठी समर्पित केल्या जातात. त्यामुळे यंदाही कोटांतर्गत जागा समर्पित झाल्यानंतर नियमित फेरीसाठी जागा वाढणार आहेत.

हेही वाचा :

Back to top button