सोलापूर : पोषण आहारात व्हावा बेदाण्याचा समावेश : राजू शेट्टी | पुढारी

सोलापूर : पोषण आहारात व्हावा बेदाण्याचा समावेश : राजू शेट्टी

सोलापूर; पुढारी वृत्तसेवा : राज्यात यंदा बेदाण्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात झाले आहे. यंदा द्राक्षांना म्हणावा तेवढा भाव न मिळाल्याने बेदाण्याचे उत्पादन वाढले आहे. यावर तोडगा काढण्यासाठी बेदाण्याचा उपयोग शालेय पोषण आहारात करण्याची मागणी आता पुढे येऊ लागली आहे. तसे झाल्यास त्यातून शेतकर्‍यांनाही काहीसा आर्थिक दिलासा मिळेल.

सध्या बेदाण्याच्या दरात विक्रमी घसरण झाली आहे. ग्राहकांअभावी लाखो टन बेदाणा शीतगृहात पडून आहे. पोषण आहारात बेदाण्याचा समावेश केल्यास बेदाण्याची समस्या काही प्रमाणात सुटू शकणार आहे. गेल्या दोन वर्षांपासून द्राक्ष उत्पादक प्रचंड अडचणीत सापडले आहेत. अनेक शेतकर्‍यांची द्राक्षे मागणीअभावी वेलीवरच सुकून गेली. बाजारात द्राक्षाला कवडीमोल दर मिळाला. यावर्षीही द्राक्ष बाजारात भीषण परिस्थिती होती. अवघ्या दहा रुपये प्रति किलोप्रमाणे द्राक्षे बाजारात विकली गेली. काही शेतकर्‍यांनी द्राक्षांपासून बेदाणानिर्मिती केली आहे. मात्र हा बेदाणा मागणीअभावी शीतगृहात तसाच पडून आहे. त्यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणीत सापडले आहेत.
द्राक्ष उत्पादक शेतकर्‍यांच्या प्रश्नांवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी नुकतीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी बेदाण्याचा समावेश शालेय पोषण आहारात करावा, अशी मागणी केली आहे. शालेय पोषण आहारात बेदाण्याचा समावेश केल्याने बालकांना उच्च प्रतीची पोषणमूल्ये मिळतील. याबाबत मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक निर्णय घेऊ, अशी ग्वाही शेट्टी यांना दिली आहे.

सध्या सोलापूर व सांगली जिल्ह्यातील शीतगृहे बेदाण्यांनी भररुन गेली आहेत. कवडीमोल दराने बेदाणा बाजारात विकला जात आहे. यामुळे यावर्षी कित्येक शेतकर्‍यांनी आपल्या द्राक्षबागांवर कुर्‍हाड चालवली आहे. कोरोना काळापासून द्राक्ष उत्पादक संकटात सापडले आहेत. द्राक्ष उत्पादनाला मोठा खर्च होतो. मात्र बाजारातील या परिस्थितीमुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी कर्जबाजारी झाले आहेत.
जिल्ह्यातील शीतगृहात 64 हजार 547 मेट्रिक टन बेदाणा शेतकर्‍यांकडून ठेवण्यात आलेला आहे.

कर्जावरील व्याज शासनाने द्यावे

शीतगृहात बेदाणा ठेवल्यानंतर व्यवस्थापनाकडून पावती दिली जाते. त्यावर काही बँका तारण कर्ज देतात. अशा कर्जावरील व्याज शासनाने अनुदान स्वरूपात दिल्यास शेतकर्‍यांना मोठा दिलासा मिळेल.

गेल्या दोन वर्षांपासून द्राक्ष उत्पादक प्रचंड अडचणीत सापडले आहेय. सध्या बेदाण्याला मागणीच नाही. यामुळे शासनाने हा बेदाणा खरेदी करुन त्याचा शालेय पोषण आहारात समावेश करावा. त्याचबरोबर शीतगृहात बेदाणा ठेऊन घेतलेल्या कर्जावरील व्याज सरकारने अनुदान स्वरूपात द्यावे, ही मागणीही केली आहे.
– राजू शेट्टी, अध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना

Back to top button