सातारा, माढ्याची रणनीती ठरणार; उपमुख्यमंत्री गुरुवारी जिल्हा दौर्‍यावर | पुढारी

सातारा, माढ्याची रणनीती ठरणार; उपमुख्यमंत्री गुरुवारी जिल्हा दौर्‍यावर

सातारा; पुढारी वृत्तसेवा :  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गुरुवार, दि. 22 जून रोजी सातारा जिल्हा दौर्‍यावर असून बुथ संमेलन, आढावा बैठक, जिहे कठापूर योजनेचे भूमिपूजन यासह विविध कामांचा आढावा घेणार आहेत. यावेळी ते सातारा व माढा लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेणार आहेत. त्याद़ृष्टीने या दोन्ही कोअर कमिटीची बैठक घेऊन ते आगामी रणनीती ठरवणार असल्यामुळे या दौर्‍याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. दरम्यान, गुरुवारी दहिवडी येथे ना. फडणवीस यांची जाहीर सभा होणार असल्याचे भाजपचे जिल्हाध्यक्ष आ. जयकुमार गोरे यांनी सांगितले.

ना. देवेंद्र फडणवीस यांच्या दौर्‍याची माहिती आ. जयकुमार गोरे यांनी शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषदेत दिली. यावेळी आ. शिवेंद्रराजे भोसले, मनोज घोरपडे, धैर्यशील कदम उपस्थित होते. आ. जयकुमार गोरे म्हणाले, देवेंद्र फडणवीस जिल्हा दौर्‍यावर येत आहेत. गुरुवारी कराडमध्ये ते बुथ अध्यक्षांच्या संमेलनाला मार्गदर्शन करणार आहेत. तसेच कराड दक्षिणच्या लाभार्थी मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर सातारा लोकसभा मतदार संघाच्या कोअर कमिटीची बैठक होणार आहे. यामध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती, लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने चर्चा होणार आहे. याचबरोबर जिल्ह्यातील मेडिकल कॉलेजचे काम, एमआयडीसी याचाही आढावा घेतला जाणार आहे. बरड येथे संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे दर्शन उपमुख्यमंत्री घेणार आहेत. तर सायंकाळी दहिवडी येथे पाणी पुरवठा योजनेचे उद्घाटन होवून जाहीर सभेस ना. फडणवीस संबोधित करणार आहेत. यावेळी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर, आ. शिवेंद्रराजे भोसले, आ. गोपीचंद पडळकर उपस्थित राहणार आहेत. या सभेनंतर माढा लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला जाणार असल्याचे आ. गोरे यांनी सांगितले.

पोवई नाका परिसरात लोकनेते स्व. बाळासाहेब देसाईंच्या स्मारकाबाबत समाजातील सर्व घटकांना विचारात घेऊन भूमिका घ्यावी. कुणाच्या भावना दुखावणार नाहीत याची काळजी घ्यावी. सगळ्यांचा सन्मान ठेऊन स्मारक होणे आवश्यक असल्याचे मत आ. जयकुमार गोरे यांनी व्यक्त केले.

Back to top button