Nashik : संकटमोचक पुन्हा नाशिकच्या आखाड्यात, उद्या संवाद मेळावा | पुढारी

Nashik : संकटमोचक पुन्हा नाशिकच्या आखाड्यात, उद्या संवाद मेळावा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

मोदी@9 महा जनसंपर्क अभियानाच्या निमित्ताने भाजपने संकटमोचक तथा ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांना पुन्हा एकदा नाशिकच्या आखाड्यात उतरविण्याची तयारी केली आहे. पक्षातर्फे रविवारी (दि. १८) पक्षातर्फे आयोजित व्यापारी संवाद संमेलनाला ते संबाेधित करणार आहेत. या माध्यमातून महाजन नाशिकची सूत्रे पुन्हा एकदा आपल्या हाती घेण्याची शक्यता आहे.

आगामी लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीने भाजपने तयारी सुरू केली आहे. पक्षाअंतर्गत खांदेपालट करतानाच राज्यातील जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी मोदी @9 अभियान हाती घेतले आहे. याच दरम्यान भाजपने उत्तर महाराष्ट्राच्या प्रभारीपदी पक्षाचे सरचिटणीस विजय चौधरी यांची नियुक्ती केली. नाशिकची जबाबदारी राजेंद्र राऊत यांच्या खांद्यावर दिल्याने आपोआप महाजन यांचा पत्ता कट झाला. त्यामुळे भाजपने महाजन यांचे पंख छाटल्याचे बोलले जात होते. तसेच महाजन यांच्या नाशिकमधील समर्थकांमध्येही नाराजीचा सूर होता.

लोकसभेच्या तयारीवेळी पक्षाअंतर्गत जबाबदाऱ्यांचे फेरनियोजन करताना ना. महाजन यांना उत्तर महाराष्ट्राच्या राजकारणातून भाजपने बाजूला सारल्याबाबत सर्वत्र उलटसुलट चर्चा होती. तसेच निवडणुकांच्या तयारीपासून महाजन यांना दूर ठेवणेही योग्य नसल्याची जाणीव भाजपला झाली असावी. म्हणूनच पक्षाने लोकसभेसाठी पक्षाच्या उत्तर महाराष्ट्र क्लस्टर प्रमुखपदी महाजन यांची नेमणूक करत या विषयावर पांघरूण घालण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, भाजपने त्यापुढे जाऊन रविवारी (दि.१८) गंगापूर रोडवरील रावसाहेब थोरात सहभागृहाच्या प्रांगणात सकाळी ९ वाजता आयोजित व्यापारी संमेलनाला ना. महाजन यांना पाचारण केले आहे. या संमेलनाच्या माध्यमातून महाजन हे पुन्हा नाशिकमध्ये सक्रिय होण्याची शक्यता असल्याने महायुतीमधील मित्रपक्ष सेनेसह अन्य पक्षांच्या डोकेदुखीत भर पडणार आहे.

पालकमंत्रिपदी वर्णी?

राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारासोबत जिल्हानिहाय पालकमंत्री बदलाच्या हालचाली सुरू असल्याचे समजते आहे. या बदलामध्ये नाशिकच्या पालकमंत्रिपदाची सूत्रे ना. महाजन यांच्या हाती सोपविली जातील, अशी जोरदार राजकीय चर्चा आहे. त्यामुळे महाजन यांना पुन्हा एकदा नाशिकमध्ये लाँचिंगसाठी भाजपने व्यापारी संमेलनाचा मुहूर्त शोधल्याचे बोलले जात आहे.

हेही वाचा : 

Back to top button