

न्यूयॉर्क : 'विषारी जीव' म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर सापच उभे राहतात. मात्र, सापांमध्येही बिनविषारी अशा अनेक प्रजाती आहेत. तसेच सापांशिवाय अन्यही अनेक प्राणी जहाल विषारी आहेत. असाच एक जीव जमिनीवर नव्हे तर खोल समुद्रात आढळतो. हा जीव म्हणजे एका प्रजातीची गोगलगाय आहे. ही गोगलगाय अतिशय विषारी असते व तिच्या विषावर औषधही नाही!
गोगलगाय म्हणजे आपल्याला एक निरुपद्रवी जीव वाटत असतो. मात्र, ही गोगलगाय स्वतःच्या संरक्षणासाठी अशा विषाचा उपयोगही करते. या गोगलगायीचे नाव आहे 'जिओग्राफी कोन'. जिओग्राफी कोन मुख्यतः इंडो-पॅसिफिक समुद्राच्या आतील खडकांवर राहतात. ही गोगलगाय आपल्या बचावासाठी घातक विष सोडते. या विषाच्या 10 वा भागही एखाद्या व्यक्तीचा सहज जीव घेऊ शकतो. महत्त्वाची बाब म्हणजे या विषावर अद्याप कोणतंही औषध बनलं नाही.
शंख असलेल्या गोगलगायींच्या पाचशे प्रजातींमध्ये ही सर्वात विषारी प्रजाती आहे. या गोगलगायीच्या विषाने अनेक लोकांचा मृत्यूही झालेला आहे. तिचे शास्त्रीय नाव 'कोनस जियोग्राफस' असे आहे. लहान माशांची शिकार करून ही गोगलगाय उदरनिर्वाह करते. तिचा शंख लंबगोलाकार असतो व त्याची लांबी दहा ते पंधरा सेंटीमीटर असते.