MPL : एमपीएल'साठी नाशिकच्या पाच क्रिकेटपटूंची निवड

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
इंडियन प्रीमिअर लीगच्या धर्तीवर महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने दि. १५ ते २९ जून या कालावधीत गहुंजे क्रिकेट स्टेडियमवर महाराष्ट्र प्रीमिअर लीगचे (एमपीएल-२०२३) आयोजन केले आहे. या स्पर्धेसाठी सहा संघ निश्चित केले असून, आयपीएलप्रमाणेच या संघांमध्ये सामने रंगणार आहेत. ‘एमपीएल’साठी नाशिकच्या सत्यजित बच्छाव, मुर्तुझा ट्रंकवाला, यासर शेख, शर्विन किसवे, साहिल पारख या खेळाडूंची निवड लिलावाद्वारे विविध संघांमध्ये झाली आहे.
सुहाना मसालेवालेंचा पुणे संघ पुणेरी बाप्पा नावाने ओळखला जाईल. ऋतुराज गायकवाड हा या संघाचा आयकॉन खेळाडू असेल. पुनित बाल समूहाचा संघ कोल्हापूर टस्कर्स, वेंकटेश्वरा इंडस्ट्रीजचा संघ छत्रपती संभाजी किंग्ज, जेटस सिंथेसिसचा संघ रत्नागिरी जेटस, कपिल सन्सचा संघ सोलापूर रॉयल्स अशा नावाने ओळखला जाईल. ईगल इन्फ्रा इंडियाच्या संघाचे नाव ईगल नाशिक टायटन्स असून, या संघाचा आयकॉन राहुल त्रिपाठी हा खेळाडू असणार आहे.
सोलापूर रॉयल्सने सत्यजित बच्छावला ३ लाख ६० हजार रुपयांना खरेदी केले. मुर्तुझा ट्रंकवाला याला छत्रपती संभाजी किंग्जने १ लाख ८० हजार रुपयांना, ईगल नाशिक टायटन्सने साहिल पारखला ६० हजारांमध्ये, तर शर्विन किसवेला ४० हजारांत आपल्या संघात सामावून घेतले. यासर शेखलाही सोलापूर रॉयल्सने खरेदी केले आहे. दरम्यान, राज्यस्तरीय एमपीएल स्पर्धेसाठी निवडीबद्दल नाशिकच्या पाचही खेळाडूंचे जिल्हा क्रिकेट संघटनेचे चेअरमन विनोद शहा, सचिव समीर रकटे आदींनी कौतुक केले आहे.
हेही वाचा :