नाशिक : श्वान निर्बीजीकरणास आजपासून सुरुवात

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
महासभेने श्वान निर्बीजीकरणास मंजुरी दिल्यानंतर पशुवैद्यकीय वून निविदा प्रक्रिया राबवून जेनी स्मिथ या संस्थेला त्याबाबतचे काम देण्यात आले. गेल्या एप्रिल महिन्यात शरण या संस्थेची मुदत संपुष्टात आल्यानंतर महापालिकेने पुन्हा निविदा प्रक्रिया राबविली. दरम्यान, गुरुवार (दि. ८) पासून जेनी स्मिथ या संस्थेच्या माध्यमातून श्वान निर्बीजीकरणास सुरुवात केली जाणार आहे. ॲनिमल वेलफेअर बोर्ड ऑफ इंडिया यांच्या मार्गदर्शनानुसार काम केले जाणार आहे.
महापालिकेकडून श्वान निर्बीजीकरणावर लाखो रुपये खर्च केले जात असले, तरी मोकाट श्वानांची संख्या कमी न होता वाढतच आहे. या भटक्या श्वानांचा सुळसुळाट गल्लीबोळात असून, बहुतांश भागात त्यांची दहशतही बघावयास मिळते. नाशिकरोड, पंचवटी, सिडको, सातपूर, पश्चिम व नाशिक पूर्व या सहाही विभागांत श्वानांची संख्या जास्त असून, त्यांची संख्या नियंत्रणात आणण्याची गरज आहे. दरम्यान, श्वानांचे निर्बीजीकरण करण्यासाठी महापालिकेकडून नव्याने ठेका दिला असून, श्वानांचे निर्बीजीकरण केले जाणार आहे. मागील महिन्यात शरण या संस्थेला दिलेल्या ठेक्याची मुदत संपुष्टात आली. आता हे काम जेनी स्मिथ ॲनिमल या संस्थेला देण्यात आले आहे.
श्वान निर्बीजीकरणासाठी दोन वाहने उपलब्ध केली जाणार असून, आवश्यकतेनुसार कर्मचारी असणार आहेत. नागरिकांनी केलेल्या तक्रारीची तत्काळ दखल घेऊन कारवाई केली जाणार आहे. त्याचबरोबर शहर व परिसरातील मोकाट श्वानांना पकडून त्यांना विल्होळी येथील केंद्रात नेऊन त्यांचे निर्बीजीकरण केले जाणार आहे. दिवसाला 30 ते 40 श्वानांचे निर्बीजीकरण केले जाणार आहे. २०२२-२३ या वर्षात नऊ हजारांहून अधिक श्वानांचे निर्बीजीकरण करण्यात आले आहे.
महिन्याला आठशे श्वानांचे निर्बीजीकरण
शहरात श्वानांची वाढलेली संख्या लक्षात घेता, महिन्याला 800 ते हजार श्वानांचे निर्बीजीकरण केले जाणार आहे. विल्होळी येथील निर्बीजीकरण केंद्रात ही प्रक्रिया केली जाते. श्वानांना तीन दिवस निगराणीत ठेवल्यानंतर पुन्हा त्यांच्या परिसरात सोडले जाते.
हेही वाचा :