कृषीप्रधान देशातील शेतकऱ्यांना रेशनच्या धान्यावर जगावं लागतं याला विकास म्हणत नाही : संजय राऊत | पुढारी

कृषीप्रधान देशातील शेतकऱ्यांना रेशनच्या धान्यावर जगावं लागतं याला विकास म्हणत नाही : संजय राऊत

नाशिक, प्रतिनिधी :संपूर्ण देशात शेतकऱ्यांची अवस्था बिकट झाली आहे. शेतमालाला स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार हमीभाव मिळावा यासाठी आम्ही लोकसभेत प्रश्न मांडतो त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभेतून निघून जातात, अशी टीका लोकसभेचे खासदार संजय राऊत यांनी केली. वडनेर भैरव येथे सलादे बाबा कला क्रीडा मंडळाच्या वतीने आयोजित बळीराजा गौरव समारंभ प्रसंगी ते बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गौतम बापू पाटील हे होते. व्यासपीठावर मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सरचिटणीस नितीन ठाकरे, जिल्हा शेतकरी काँग्रेसचे अध्यक्ष संपतराव वक्ते, शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते अद्वय हिरे, उपनेते सुनील बागुल, जिल्हा संपर्कप्रमुख जयंत दिंडे, विजय करंजकर, विनायक पांडे, वसंत गीते, संचालक डॉक्टर सयाजी गायकवाड, पंचायत समितीचे माजी सभापती नितीन आहेर, बाजार समितीचे उपाध्यक्ष संजय जाधव, मनोहर पाटोळे, अॅड. पोपटराव पवार उपस्थित होते.

खासदार राऊत पुढे म्हणाले की, वडनेर भैरव गावाचे नाव अनेकदा ऐकले होते. येथील भैरवनाथ देवस्थान जागृत देवस्थान असून नवसाला पावणारे आहे. मी या देवाला बळीराजाला सुखी कर व शेतकरी विरोधी सरकारचा अंत होऊ दे असे साकडे घातले आहे.  देशभरात 85 कोटी शेतकऱ्यांना रेशनच्या धान्यावर जगावं ही शोकांतिका असल्याचे संजय राऊत म्हणाले.  जो शेतकरी देशाचे पोट भरतो त्या शेतकऱ्याला मोदी रेशनवर जगवतात याला विकास म्हणत नाही असे राऊत म्हणाले. देशात लवकरच कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग आणण्याच्या दृष्टीने सरकार काम करत असून यामुळे गुलामीचं नवं पर्व सुरू होणार आहे. भविष्यात गौतम अडाणी च्या नावावर देशातल्या जमिनी राहतील. महाराष्ट्रात सध्या असलेले सरकार हे घटनाबाह्य व बेकायदेशीर असून लवकरच सरकार पायउतार होणार असल्याचा पुनरुचार राऊत यांनी केला.

याप्रसंगी सलादे बाबा कलाक्रीडा मंडळाच्या वतीने कादवा कारखान्याचे उपाध्यक्ष शिवाजीराव बस्ते, एनडी माळी, कोंडाजी पाचोरकर, दौलतराव भालेराव, भास्कर निफाडे यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमासाठी शिवसेनेचे तालुकाप्रमुख विलास भवर, मंडळाचे सल्लागार सुरेश सलादे, दत्तात्रय निखाडे, विश्वस्त दीपक पाचोरकर, महेंद्रसिंग परदेशी, अनिल पवार, उत्तम भोसले, दत्तात्रय शिंदे, राहुल पाचोरकर, मानसिंग ढोमसे, युवराज सगर उपस्थित होते.

हेही वाचा :

Back to top button