रेशीम पार्कसाठी अभ्यासपूर्ण प्रस्ताव सादर करा : छगन भुजबळ | पुढारी

रेशीम पार्कसाठी अभ्यासपूर्ण प्रस्ताव सादर करा : छगन भुजबळ

येवला (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा

येवला शहर हे पर्यटनदृष्ट्या व पैठणीसाठी अतिशय महत्त्वाचे शहर असून पैठणी उद्योगाला अधिक चालना मिळण्याच्या दृष्टीने एरंडगाव येथे राखीव केलेल्या जागेत रेशीम पार्क उभारण्यासाठी अभ्यासपूर्ण प्रस्ताव शासनास सादर करावा, अशा सूचना माजी उपमुख्यमंत्री व आमदार छगन भुजबळ यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

नाशिक येथील कार्यालयात भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक झाली. यावेळी प्रादेशिक रेशीम कार्यालय पुणेच्या सहायक संचालक डॉ. कविता देशपांडे, नाशिकचे रेशीम विकास अधिकारी इंगळे, सारंग सोरते, गटविकास अधिकारी अन्सार शेख, दिलीप खैरे, वसंत पवार, शिवाजी खापरे, गोदावरी कन्सल्टंट सर्विसेसचे नितीन सोनवणे, राहुल महाजन, केतन काढवे, वैभव भावसार यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

भुजबळ म्हणाले की, येवला येथील पैठणी उद्योगाला चालना देण्यासाठी या ठिकाणी तुतीच्या शेतीला प्रोत्साहन देऊन रेशीम उत्पादनासाठी रेशीम पार्कची गरज आहे. त्यासाठी २६ जानेवारी २०२० रोजीच्या ग्रामसभा ठरावानुसार ग्रा.पं. एरंडगाव खुर्द (ता. येवला) यांनी गट नंबर २९३ मध्ये २५ एकर जागा रेशीम पार्कसाठी दिली आहे. येवला परिसरातील पैठणी उद्योग व वस्त्रोद्योगासाठी लागणारा रेशीम धागा परराज्यातून आयात करावा लागतो. त्यामुळे कच्च्या मालाचे (रॉ सिल्क) उत्पादन स्थानिक पातळीवर व्हावे, यासाठी येवला येथे रेशीम पार्कची नितांत गरज आहे.

येवला येथील पैठणी क्लस्टर कार्यान्वित झाल्यानंतर वर्षाला किमान १२५ मे. टन कच्चे रेशीम सूत लागणार आहे. त्यासाठी येवला समूह व जवळच्या जिल्ह्यामध्ये साधारणतः २५०० एकर तुती लागवड असणे आवश्यक आहे. लागवडीसाठी शासनाने बेणे, रोपे, अंडीपुंज, साहित्य व तुती उद्योगाचे प्रशिक्षण द्यावे लागणार आहे. तुती रेशमची अंडीपुंजी बनविण्यासाठी ग्रेनेजची निर्मिती करावी लागणार आहे. तसेच टसर रेशीम शेतकऱ्यांना नियमित दर्जेदार व आवश्यक त्या प्रमाणात अंडीपुंज उत्पादन करून रेशीम उद्योगाच्या विकासाची आवश्यकता आहे. शेतकऱ्यांना टसर अंडीपुंजचा नियमित व पुरेसा पुरवठा व्हावा म्हणून मड हाउसची निर्मिती करावी लागणार आहे. या ठिकाणी शेतकऱ्यांना तुती व टसर रेशीम लागवडीसाठी प्रोत्साहन देऊन सुधारित तंत्रज्ञानाचा प्रसार व प्रचार करावा, अशा सूचना त्यांनी केल्या.

हेही वाचा :

Back to top button