पुणे-बंगळूर महामार्गावर घुणकी फाट्याजवळ रोड रोलरला आर्टिगा गाडीची धडक; २ ठार, ४ गंभीर जखमी | पुढारी

पुणे-बंगळूर महामार्गावर घुणकी फाट्याजवळ रोड रोलरला आर्टिगा गाडीची धडक; २ ठार, ४ गंभीर जखमी

किणी ; पुढारी वृत्तसेवा : रस्त्याकडेने चाललेल्या रोड रोलरला आर्टिगा गाडीने पाठीमागून जोराची धडक दिली. या भीषण अपघातात २ जण ठार तर ४ जण गंभीर जखमी झाले. हा अपघात घुणकी फाट्याजवळ घडला. राहुल अशोक शिखरे (वय ३० रा. मिणचे) व सुयोग दत्तात्रय पवार (वय २८ रा. टोप) अशी ठार झालेल्यांची नावे आहेत.

या विषयी अधिक माहिती अशी की, पुणे-बंगळूर महामार्गावर किणी टोल नाका व घुणकी फाट्यादरम्यान सकाळी साडेसहा वाजता हा अपघात घडला. टोप, शिये व मिणचे येथील डॉल्बी, लेजर लाईट व डेकोरेशन क्षेत्रात काम करणारे सहाजण मुंबई येथे त्यांच्या कामासंदर्भातील प्रदर्शन बघण्यासाठी मुंबई येथे गेले होते. प्रदर्शन पाहून रात्री अकरा वाजण्याच्या दरम्यान ते मुंबई येथील आर्टिगा गाडी (क्र.एम एच ४८ ए के ६५४५) ने घरी परतण्यासाठी निघाले. त्यांच्यासोबत आणखी एक गाडी होती. मध्यरात्रीनंतर पुण्याजवळ सर्वजण चहा घेऊन निघाले, पहाटे साडेसहा वाजण्याच्या दरम्यान घुणकी फाट्याजवळ किणी टोल नाक्याच्या दिशेने चाललेल्या रोड रोलरला आर्टिगाने जोराची धडक दिली. ही धडक एवढी जोरदार होती की, धडकेने रोडरोलर हा साईड रस्त्यावर जात पलटी झाला, तर गाडीचा पुढचा भाग चक्काचूर होऊन तिचे तोंड पुण्याच्या दिशेला झाले. धडक होताच महामार्गावरील वाहतूक जागीच ठप्प झाली.

अपघात होताच आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी तसेच महामार्गावरील प्रवाशांनी तातडीने बचावकार्य सुरू केले. अपघातग्रस्तांचे बचावासाठी ओरडणे अंगावर शहारे आणणारे होते. अपघातात गंभीर जखमी झालेल्या सुयोग पाटील (वय २८), सुनील कुरणे (वय २४), वैभव चौगुले (वय २३ सर्व रा.टोप) अनिकेत जाधव (वय २२) निखिल शिखरे (वय २७) व राहुल शिखरे (वय ३० सर्व रा. मिणचे) या सर्व जखमींना तातडीने नाणीज मठाच्या रुग्णवाहिकेतून गंभीर जखमी अवस्थेत कोल्हापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. रोलर चालक दादासो दबडे (वय ४० रा वाठार) यांनाही उपचारासाठी हायवे पेट्रोलिंगच्या रुग्णवाहिकेतून उपचारासाठी दाखल करण्यात आले. शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्यांपैकी सुयोग पवार व राहुल शिखरे यांचे उपचारापूर्वीच निधन झाल्याचे घोषित करण्यात आले. महामार्गाचे सहापदरीकरणाचे काम सुरू असल्याने वाहनांना जाण्यासाठी साईड रस्ता नसल्याने वाहतूक खोळंबली होती.

हेही वाचा : 

शिंदे गटात कुरबुरी, पण गद्दारांसाठी आमचे दरवाजे कायमचे बंद : संजय राऊत
IPL 2023 Mohit sharma | सूर्याला बोल्ड करताच मोहित शर्माने जोडले हात, ‘या’ चेंडूने सामना फिरवला, पाहा व्हिडिओ
Karnataka cabinet expansion | सिद्धरामय्या- शिवकुमारांच्या मंत्रिमंडळाचा आज विस्तार, २४ मंत्री घेणार शपथ, अशी आहे संभाव्य मंत्र्यांची यादी

 

Back to top button