नाशिकमधील उंटांच्या ताफ्यांचा सस्पेन्स कायम; शासकीय यंत्रणा हाकतेय “उंटावरून शेळ्या’ | पुढारी

नाशिकमधील उंटांच्या ताफ्यांचा सस्पेन्स कायम; शासकीय यंत्रणा हाकतेय "उंटावरून शेळ्या'

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

गेल्या आठवड्यापासून शहरासह जिल्ह्यात दाखल होणाऱ्या उंटांच्या ताफ्यांचा सस्पेन्स कायम आहे. नाशिकपाठोपाठ मालेगावमध्ये उंट ताब्यात घेण्यात आले आहेत. त्यामुळे नाशिक मुक्कामी असलेल्या उंटांची संख्या दीडशेवर जाऊन पोहोचली आहे. मात्र, हे उंट कुठून आले, त्यांना कोणी आणले, कुठे जात होते. याबाबत जिल्हा प्रशासनाला अंतिम निष्कर्ष काढण्यात अपयश आले आहे. पोलिस वगळता इतर शासकीय यंत्रणा केवळ उंटावरून शेळ्या हाकण्याचे काम करत असल्याचे चित्र आहे.

पाच दिवसांपूर्वी गुजरात, राजस्थान सीमाभागातून शेकडो किलोमीटर पायपीट करून शेकडोंच्या संख्येने उंट नाशिकमध्ये दाखल झाले होते. राजस्थान येथून हैदराबाद येथे कत्तलीसाठी उंटांची तस्करी केले जात असल्याचा संशय प्राणिप्रेमींनी व्यक्त केल्यानंतर जिल्हा प्रशासनाला जाग आली. ९० उंटांना ताब्यात घेऊन त्यांची रवानगी चुंचाळे परिसरातील पांजरापोळमध्ये करण्यात आली. तर दुसऱ्या दिवशी २३ उंटांना मखलाबाद शिवारातून पांजारपोळ येथे हलविण्यात आले होते. या जीवघेण्या प्रवासामुळे एका उंटाला प्राणाला मुकावे लागले तर एक उंट अत्यवस्थ आहे.

सटाणा, कळवण, दिंडोरी आणि वणी या परिसरातून नाशिक शहराकडे मार्गस्थ होत असताना ग्रामीण पोलिसांनी या उंटांसोबत असणाऱ्या मदारींना रोखले. या उंटांची पशुधन विकास अधिकारी कार्यालयातर्फे वैद्यकीय चाचणी करण्यात आली. काही उंटांना त्वचेचा आजार, काही अशक्त असल्याचे निदर्शनास आले. पशुधन विकास अधिकाऱ्यांच्या अहवालात अल्प चारा व पाणी देत उंटांचा निर्दयतेने छळ झाल्याची बाब अखेरीस उघड झाले. त्यानंतर सात उंटमालकांवर प्राण्यांचा छळ केल्याचा गुन्हा दिंडोरी पोलिसांत दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, तस्करीसाठी या उंटांचा प्रवास सुरू असल्याचा दावा सुरुवातीला पशुप्रेमींकडून केला जात होता. मात्र, ग्रामीण पोलिसांनी केलेल्या तपासात उंटांच्या तस्करीसंदर्भात ठोस पुरावे प्राप्त झाले नसून, केवळ छळ झाल्याचे निष्पन्न झाले आहे. तर या उंटांसोबत असलेले मदारी उदरनिर्वाहासाठी उंटाचे पालनपोषण करत असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. त्यामुळे पशुप्रेमींच्या दाव्यातील हवाच निघून गेली असून, जिल्ह्यात दाखल झालेल्या उंटांच्या प्रवासाबाबत संभ्रम कायम आहे.

प्रवासाचे उलगडेना गूढ

गुजरातच्या सीमावर्ती भागातून विशेषत: नंदुरबार आणि धुळे मार्गी उंटांचा ताफा नंदुरबार मार्गे महाराष्ट्र हद्दीत आला होता. शेकडोंच्या संख्येने मार्गस्थ होणाऱ्या उंटांबाबत नागरिकांकडून शंका उपस्थित केल्या जात असताना शासकीय यंत्रणांकडून दुर्लक्ष करण्यात आले. नाशिक ग्रामीण पोलिसांच्या चौकशी अहवालानंतरही उंटांच्या प्रवासाचे गूढ कायम आहे.

हेही वाचा :

Back to top button