नाशिक : … तर बागलाण, सटाणा राष्ट्रवादीचे पदाधिकारीही राजीनामा देणार | पुढारी

नाशिक : ... तर बागलाण, सटाणा राष्ट्रवादीचे पदाधिकारीही राजीनामा देणार

नाशिक (सटाणा) : पुढारी वृत्तसेवा
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा देणार असल्याचे जाहीर केल्याने ग्रामीण भागात पडसाद उमटले. बागलाण तालुका व सटाणा शहर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे मंगळवारी (दि.2) निदर्शने करून पवार यांनी निर्णय मागे घ्यावा अन्यथा तालुक्यातील सर्व पदाधिकारीही आपापल्या पदांचे सामूहिक राजीनामे देतील, असा इशारा तालुकाध्यक्ष केशव मांडवडे यांनी दिला आहे.

ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी राजकारणातून निवृत्त होणार असल्याचे संकेत मुंबईतील कार्यक्रमात दिले. हे वृत्त पसरताच शहर व तालुक्यातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या भावना अनावर झाल्या. दुपारी सटाणा बसस्थानकासमोर निदर्शने केली. तालुकाध्यक्ष मांडवडे म्हणाले, शरद पवार हे देशातील शेतकर्‍यांचे नेतृत्व करणारे, कष्टकरी, सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांची जाण असलेले नेते आहेत. त्यांचा हा निर्णय आम्हाला नामंजूर आहे. त्यांनी आपला निर्णय तत्काळ मागे घ्यावा अन्यथा आम्ही सर्व पदाधिकारी आपापल्या पदांचा राजीनामा देणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष ज. ल. पाटील, जिभाऊ सोनवणे आदींची भाषणे झाली. शहराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, कार्याध्यक्ष मनोज छोटू सोनवणे, तालुका कार्याध्यक्ष संजय पवार, विजयराज वाघ, पांडुरंग सोनवणे, भारत काटके, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष सुमित वाघ, अमोल बच्छाव, जनार्दन सोनवणे, सुनील पवार, आनंद सोनवणे, साहेबराव सोनवणे, भास्कर सोनवणे, हिरामण गांगुर्डे, केदा सोनवणे, नितीन मांडवडे, बबलू खैरनार, सनीर देवरे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

शहराध्यक्षांचा राजीनामा
तालुका कार्याध्यक्ष संजय पवार यांनी यावेळी बोलताना, पवारसाहेबांनी राजीनामा मागे न घेतल्यास सर्व पदाधिकारी सामूहिकपणे पक्षाचा राजीनामा देतील, असा इशारा दिला.तर शहराध्यक्ष राजेंद्र सोनवणे यांनी हा निर्णय येताच आपण जिल्हाध्यक्षांकडे शहराध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याचे सांगितले.

हेही वाचा:

Back to top button