नगर : तारकेश्वर गडावर हजारो भाविकांची गर्दी ; घेतले नारायणबाबांचे दर्शन | पुढारी

नगर : तारकेश्वर गडावर हजारो भाविकांची गर्दी ; घेतले नारायणबाबांचे दर्शन

पाथर्डी तालुका (नगर ) : पुढारी वृत्तसेवा :  संत नारायणबाबांचा पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त तारकेश्वर गडावर हजारो भाविकांनी गर्दी केली. मंगळवारी मुख्य दिनी दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम झाले. मंगळवारी देहु येथील गाथा मंदाराचे अध्यक्ष पांडुरंग महाराज घुले यांच्या काल्याच्या कीर्तनाने दोन दिवस चाललेल्या सोहळ्याची सांगता झाली. भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. तारकेश्वर गडावर (महिंदा) सोहळ्यासाठी रोजगार हमी आणि फलसंवर्धन कॅबिनेट मंत्री संदीपान भुमरे, खासदार डॉ. सुजय विखे, आमदार मोनिका राजळे, अ‍ॅड. प्रताप ढाकणे, हिंदू आघाडी अध्यक्ष मिलिंद एकबोटे, देविदास धस, सुनीता दौंड, अभय आव्हाड, माणिक खेडकर, अजय भंडारी, भीमराव फुंदे, अजय रक्ताटे, गाहिनाथ शिरसाट, वैभव दहिफळे, अमोल गर्जे, अ‍ॅड. प्रतिक खेडकर, संजय बडे, धनंजय बडे, सुनील ओव्हळ, डॉ राजेंद्र खेडकर आदींनी संत नारायणबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. पुण्यतिथी सोहळ्याच्या मंगळवारच्या मुख्य दिनी बीड, नगर जिल्ह्यासह राज्यातून लाखो भाविक सहभागी झाले होते.

गडाकडे येणारा मोहरी ते तारकेश्वर गड रस्त्यासाठी दोन कोटी रुपयाचा निधी सरकारने दिला असून, त्या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन खासदार डॉ. सुजय विखे व आमदार मोनिका राजळे यांच्या हस्ते करण्यात आले. आदिनाथ महाराज शास्त्री यांनी स्वागत केले. माजी आमदार साहेबराव दरेकर यांनी प्रास्तविक केले. अभिमन्यू शेकडे यांनी सूत्रसंचलन केले. तारकेश्वर गडाचे संस्थापक अध्यक्ष नारायणबाबांची आध्यात्मिक क्षेत्रात मोठी उंची होती. बीड व नगर जिल्ह्यासह राज्यात अनेक ठिकाणी त्यांचा भक्त परीवार आहे. नारायणबाबांना वाचासिद्धी संत म्हणून समजले जात होते.

कोण काय म्हणाले

गडाच्या भरीव निधीसाठी प्रयत्नशील ; रोजगार हमी व कॅबिनेट मंत्री संदीपान भुमरे : राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने अनेक विकास कामे या परिसरात सुरू केले. येणार्‍या काळातही गडाच्या सर्वांगीण विकासाबरोबर परिसरातील लोकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जे काम करणे शक्य असेल ते काम राज्याचा मंत्री म्हणून करेल, तसेच गड परिसराच्या सुशोभीकरणासाठी भरीव निधीसाठी प्रयत्नशील आहे.

कामे पूर्णत्वास नेण्यासाठी आम्ही प्रयत्न करू : खासदार डॉ. सुजय विखे

संत नारायणबाबांच्या माध्यमातून तारकेश्वर गडाशी स्व. बाळासाहेब विखे कुटुंब, राजळे कुटुंबाचे ऋणानुबंध आजही टिकून आहेत. गडाचे महंत आदिनाथ महाराज शास्त्री तारकेश्वर गडाच्या विकासासाठी प्रयत्न करत आहेत. ते पूर्णत्वास नेण्यासाठी आम्ही प्रयत्न करू.

भगवानगड पाणी योजनेत तारकेश्वर गडाचा समावेश
आमदार मोनिका राजळे : भगवानगड पाणी योजनेत तारकेश्वर गडाचा ही समावेश करण्यात आला आहे. गडाच्या विकासासाठी आम्ही कुठेही कमी पडणार नाही. गडाच्या विकासात सरकारचा निधी मिळाला असून, सर्वसामान्य कष्टकरी लोकांचेही मदत या गडाला लाभली आहे. धार्मिक आणि मोठे श्रद्धेचे स्थान असून, याच्या विकासासाठी आपण कायम प्रयत्नशील राहू.

Back to top button