नाशिक : जिल्ह्यात आता ‘आपला दवाखाना’ | पुढारी

नाशिक : जिल्ह्यात आता ‘आपला दवाखाना’

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना हा उपक्रम संपूर्ण राज्यभर राबविण्यात येत आहे. नाशिक जिल्हा परिषदेच्या जिल्हा आरोग्य विभागामार्फत येत्या 1 मे म्हणजे महाराष्ट्र दिनापासून जिल्ह्यातील 13 तालुक्यांमध्ये दवाखाना सुरू होणार आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हर्षल नेहेते यांनी दिली आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री शिंदे यांच्या संकल्पनेनुसार जिल्ह्यातील 13 तालुके आणि 2 महापालिका क्षेत्रांत जुन्या शासकीय जागांमध्ये ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ‘आपला दवाखाना’ सुरू करण्यात येत आहे. आपला दवाखानासाठी जिल्हा आरोग्य विभागाकडून नुकत्याच 13 एमबीबीएस दर्जाच्या डॉक्टरांची मुलाखत घेऊन नियुक्ती करण्यात येत आहे. प्रत्येक ‘आपला दवाखाना’मध्ये एक डॉक्टर, एक नर्स रुग्णांच्या सेवेत असेल. दररोज दुपारी 2 ते रात्री 10 या वेळेत हा दवाखाना सुरू राहणार आहे.

बाह्यरुग्ण सेवा मिळणार मोफत
जिल्हा रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे यांच्यावरील सर्वसाधारण रुग्णांचा भार कमी करण्यासाठी आपला दवाखाना ही योजना तालुकास्तरावर कार्यान्वित करण्यात येणार आहे. ‘आपला दवाखाना’ उपक्रमांतर्गत बाह्यरुग्ण सेवा मोफत औषधोपचार, मोफत प्रयोगशाळा तपासणी, टेलिकन्सल्टेशन, गर्भवती मातांची तपासणी, लसीकरण आदी उपचार सर्वांसाठी मोफत करण्यात येणार आहेत.

हेही वाचा:

Back to top button