नाशिक जिल्ह्यात लवकरच सुरू होणार आरोग्यवर्धिनी केंद्रे | पुढारी

नाशिक जिल्ह्यात लवकरच सुरू होणार आरोग्यवर्धिनी केंद्रे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

सार्वजनिक आरोग्याविषयीची सेवा जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठीच्या प्रयत्नांचा एक महत्वाचा भाग म्हणून जिल्ह्यातील महानगरपालिका, नगरपंचायती क्षेत्रांमध्ये 150 हून अधिक आरोग्यवर्धिनी केंद्रे उभारण्यात येणार आहेत. या अंतर्गत महापालिका क्षेत्रात १०६ केंद्रांना मंजुरी मिळाली असून, त्यापैकी ५४ केंद्रे पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी याबाबत पाठपुरावा करत जिल्ह्यातील नगरपंचायती आणि महापालिका क्षेत्रात आरोग्यवर्धिनी केंद्रे सुरू करण्याकरिता केलेल्या पाठपुराव्यांना यश आले आहे.

गेल्या ३ वर्षांत कोरोनाच्या धास्तीने आरोग्य हा सर्वांसाठीच अतिसंवेदनशील भाग झाला आहे. त्यामुळे प्रत्येक जण वेळोवेळी तपासणी आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना यावर भर देऊ लागला आहे. त्यासाठी केंद्र सरकारच्या आयुष्मान भारत अंतर्गत आरोग्यवर्धिनी केंद्रांची स्थापना करून नागरिकांना आरोग्य तपासणीसाठी सोयीचे ठिकाण तयार होणार आहे. या सर्व आरोग्यवर्धिनी केंद्रांकरिता सर्व निधी केंद्र सरकारने वितरीत केला आहे. एका आरोग्यवर्धिनी केंद्रात एक समुदाय वैद्यकीय अधिकारी, दोन परिचारिका, एक ड्रेसर आणि एक फार्मासिस्ट यांची नेमणूक करण्यात येणार आहे. डॉक्टरांची नेमणूक, औषधे, फर्निचर या सुविधा राष्ट्रीय आरोग्य मिशनमार्फत उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

जिल्ह्याचा विचार करता, नाशिक महापालिका क्षेत्रात १०६, मालेगावमध्ये ३६, नांदगाव, इगतपुरी प्रत्येकी ३, सिन्नर, मनमाड, चांदवड, येवला, सटाणा प्रत्येकी २, भगूर, त्र्यंबक, निफाड, सुरगाणा, कळवण, दिंडोरी, देवळा, पेठ प्रत्येकी १, देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्ड ४ अशा एकूण १७० आरोग्यवर्धिनी केंद्र लवकरच सुरू होणार आहेत.

सर्व केंद्रात आरोग्य कर्मचारी 

आरोग्यवर्धिनी केंद्राच्या माध्यमातून महापालिका वैद्यकीय सुविधा सक्षम होण्यास मदत होण्यासोबतच सर्व केंद्रांत आरोग्य कर्मचारी राहतील. त्यामुळे शहरात वैद्यकीय सुविधा उपलब्ध होईल. मोठ्या रुग्णालयांवरचा ओपीडीचा ताण कमी होईल आणि शहरी, निमशहरी भागांत वैद्यकीय पायाभूत सुविधा वाढण्यास मदत होईल.

हेही वाचा :

Back to top button