पिंपरी : सोसायट्यांत वाढीव बांधकामांमुळे वादाचे प्रसंग | पुढारी

पिंपरी : सोसायट्यांत वाढीव बांधकामांमुळे वादाचे प्रसंग

दीपेश सुराणा

पिंपरी : गृहनिर्माण सोसायट्यांच्या पार्किंगमध्ये शेड उभारणे, सदनिकांमध्ये बिल्टअप एरिया आणि एफएसआय वाढवून वाढीव बांधकाम करणे, सोसायटीच्या परवानगीशिवाय सदनिकेची बाल्कनी बंदिस्त करणे, शेड मारणे, असे प्रकार सध्या सर्रास होत आहेत. त्यामुळे सोसायट्यांमध्ये वादाचे प्रसंग उद्भवत आहेत. महापालिका प्रशासनाकडे देखील याबाबत तक्रारी करण्यात येतात. नियमाच्या बाहेर जाऊन जर वाढीव बांधकामे होत असतील तर महापालिकेकडून याबाबत कारवाईचा बडगा उगारण्यात येत असल्याचे महापालिका प्रशासनाचे म्हणणे आहे.

शहरामध्ये साडेतीन हजारापेक्षा अधिक गृहनिर्माण सोसायट्या आहेत. इमारत बांधताना बांधकाम व्यावसायिकाकडून बांधकाम परवानगी घेण्यापूर्वी इमारतीचा आराखडा मंजूर करण्यात येतो. इमारतीचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर सोसायट्यांतील रहिवासी सदनिकेच्या अंतर्गत बांधकामांमध्ये बदल करतात. अनेकदरा बाल्कनी बंदिस्त करण्यात येते. शेड टाकण्यात येते. भिंत उभारली जाते. पार्किंगमध्ये शेड टाकण्यात येते. त्यामुळे सोसायटीत राहणार्‍या रहिवाशांना त्याचा त्रास होतो.

अग्निशमन सेवेला ठरू शकतो अडथळा
इमारतीला आग लागल्याची घटना घडल्यासस आणि आपत्कालीन परिस्थितीत बाल्कनीतुन रहिवाशांना बाहेर काढावयाचे असल्यास, बाल्कनी बंदिस्त केलेली असल्यास त्यामध्ये अडथळा ठरु शकतो. त्यामुळे बाल्कनी बंदिस्त करताना अग्निशमन सेवेला त्याचा अडथळा तर होणार नाही ना, याचे भान रहिवाशांनी ठेवायला हवे.

शेजार्‍यांशी उद्भवतात वादाचे प्रसंग
सदनिकेच्या बाहेरील बाजुस एखाद्या रहिवाशाने वाढीव बांधकाम केले, बाल्कनी बंदिस्त केली, शेड टाकले तर अनेकदा त्यामुळे त्याचा शेजार्‍यांना किंवा वरील मजल्यावर रहिवाशांना त्रास होतो. त्यामुळे शेजार्‍यांशी वादाचे प्रसंग उद्भवतात. काही वेळा सोसायटी पदाधिकारी आणि सदस्यांमध्ये देखील त्यावरुन वादावादी होते.

सोसायट्यांतील सदस्यांनी वाढीव बांधकाम केले तर त्यामुळे इमारतीवरील ताण वाढतो. पर्यायाने, इमारतीचे आयुष्य कमी होते. गॅलरी बंदिस्त करणे, ग्रील लावणे, गॅलरी आत घेणे असे प्रकार घडतात. सोसायटीत एकाने वाढीव बांधकाम केले तर त्याचे पाहून दुसरी व्यक्ती देखील वाढीव बांधकाम करते. त्यामुळे इमारतीतील सदस्य व शेजारी यांचे संबंध खराब होतात. याबाबत तक्रार केल्यानंतर महापालिकेकडून तातडीने कारवाई केली जात नाही.

                                           – दत्ता देशमुख, अध्यक्ष,
                  पिंपरी-चिंचवड सहकारी गृहनिर्माण संस्था फेडरेशन

युनिफाईड डीसी रुलनुसार बिल्टअप एरिया आणि एफएसआयमध्ये बदल न करता बाल्कनी बंदिस्त करता येते. इमारतीला बांधकाम परवानगी घेतानाच तशी परवानगी घेता येते. मात्र, बांधकामात काही बदल करता येत नाही. तसेच, अन्य सदस्यांना त्याचा त्रास होऊ नये, यासाठी सोसायटीची परवानगी गरजेची आहे. सोसायट्यांमध्ये वाढीव बांधकामे झाल्यास तसेच त्याबाबत सोसायटी अध्यक्ष, कमिटी सदस्यांच्या तक्रारी आल्यास त्याबाबत महापलिकेकडून कारवाई करते.

                                                     – राजेंद्र राणे,
                                   कार्यकारी अभियंता, महापालिका

Back to top button