जळगाव : वृद्धाची हत्या, नाल्यात आढळला मृतदेह | पुढारी

जळगाव : वृद्धाची हत्या, नाल्यात आढळला मृतदेह

जळगाव : पुढारी वृत्तसेवा

यावल तालुक्यातील किनगाव येथील इंदिरानगर भागातील रहिवाशी ६० वर्षीय वृद्धाची गळा चिरून निर्घृण हत्या झाल्याची बाब शुक्रवार, दि. 24 रोजी सकाळी उघडकीस आल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. चुंचाळेकडे जाणार्‍या रस्त्यावर एका नाल्याच्या पुलाखाली शुक्रवारी सकाळी त्यांचा मृतदेह आढळून आला असून घटनास्थळी पोलिसांचे पथक दाखल झाले आहे.

किनगाव, ता.यावल येथील इंदिरानगर भागातील रहिवासी भीमराव सोनवणे (६०) हे व्यवसायाने ट्रक चालक असून कामावरुन रात्री घरी परत आलेले नव्हते. तर शुक्रवारी सकाळी इंदिरानगर वस्तीच्या पुढील चुंचाळे रस्त्यावरील नाल्याच्या पुलाच्या खाली त्यांचा गळा कापलेला अवस्थेत मृतदेह शेतमजुरांना दिसून आला आणि खळबळ उडाली. मजुरांना गावात माहिती दिल्यानंतर यावल पोलिसांना माहिती देण्यात आली.

पोलिस अधिकार्‍यांची धाव

घटनास्थळी यावल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर, पोलिस उपनिरीक्षक सुनील मोरे, सहाय्यक फौजदार मुजफ्फर खान, असलम खान, भुषण चव्हाण हे पथकासह दाखल झाले. मयताच्या पश्चात मुलगा, मुलगी, सून नातवंडे असा परीवार आहे. खूनाचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

हेही वाचा:

Back to top button