पुणे : दुरुस्तीसाठी निरा-मोरगाव रस्ता तब्बल 5 दिवस बंद | पुढारी

पुणे : दुरुस्तीसाठी निरा-मोरगाव रस्ता तब्बल 5 दिवस बंद

निरा/मोरगाव : पुढारी वृत्तसेवा :  गुळुंचे-कर्नलवाडी (ता. पुरंदर) दरम्यानचा चढ कमी करण्याकरिता खोदकामासाठी दि. 23 ते 27 मार्च या पाच दिवसांसाठी निरा-मुर्टी-मोरगाव हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. त्यामुळे वाहनचालकांनी निरा-वाल्हे-जेजुरी-मोरगाव या पर्यायी रस्त्याचा वापर करावा, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभाग, बारामतीचे अभियंता रामसेवक मुखेकर यांनी दिली. निरा-मुर्टी-मोरगाव-सुपे रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. या कामांतर्गत गुळुंचे-कर्नलवाडीदरम्यान असलेल्या कठीण चढाचे खोदकाम करण्याचे काम प्रगतिपथावर आहे.

मात्र, या कामात वाहतुकीमुळे अडथळा निर्माण होऊ शकतो. परिणामी, वाहतूक कोंडी होत प्रवाशी, वाहनचालक तसेच स्थानिकांना त्याचा त्रास सहन करावा लागेल. त्यामुळे या रस्त्यावरील वाहतूक बंद करण्याचा निर्णय बुधवारी (दि. 22) रात्री उशिरा सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतला. दि. 23 ते 27 मार्च या पाच दिवसांसाठी हा रस्ता वाहतुकीसाठी बंद असणार आहे. या कालावधीमध्ये वाहनचालकांनी निरा-वाल्हे-जेजुरी-मोरगाव या पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन सार्वजनिक बांधकाम विभागाने केले आहे. याबाबतचे निवेदन वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्याला देण्यात आले आहे. त्यानुसार सहायक पोलिस उपनिरीक्षक वसंतराव वाघोले यांच्या मार्गदर्शनाखाली मोरगाव पोलिस मदत केंद्रामार्फत पोलिसांनी वाहतूक बंदचे बॅरिकेट्स लावण्यात आले आहेत, असे पोलिस नाईक संदीप लोंढे यांनी सांगितले.

Back to top button