धुळे : राष्ट्रवादीने कचरा ठेकेदाराच्या तोंडाला काळे फासले | पुढारी

धुळे : राष्ट्रवादीने कचरा ठेकेदाराच्या तोंडाला काळे फासले

धुळे : पुढारी वृत्तसेवा

धुळे शहरात कचरा संकलनाचे काम करणाऱ्या स्वयंभू कंपनीच्या व्यवस्थापकाबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची चर्चा सुरू असतानाच विसंवाद झाल्याने मुद्द्यावरची चर्चा गुद्ध्यावर पोहोचली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी व्यवस्थापकाच्या दिशेने अंडी फेकून तसेच शाई फेक करून रोष व्यक्त केला. कचरा ठेकेदार नियमानुसार वेळेवर काम करीत नसल्याने सनदशीर मार्गाने आंदोलन करण्यासाठी आलो. मात्र त्यांनी धुळेकरांविषयी अपशब्द काढल्याने आंदोलनाचा तडाखा दिल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे.

धुळे शहरात कचरा संकलनाचे काम स्वयंभू कंपनीला देण्यात आले आहे. या कंपनीच्या दालनाबाहेर मंगळवार, दि.21 राष्ट्रवादी काँग्रेसने आंदोलन केले. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रणजीत भोसले सुमित पवार, जोसेफ मलवारी यांच्यासह असंख्य कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले. यावेळी कंपनीचे व्यवस्थापक अभिजीत फडतरे यांच्या समवेत कार्यकर्त्यांनी संवाद सुरू केला. मात्र अचानक वाद झाल्याने कार्यकर्ते आक्रमक झाले. त्यांनी फडतरे यांच्या अंगावर शाई फेक करून अंडी फेकून रोष व्यक्त केला. यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी महानगरपालिका प्रशासनाला निवेदन देऊन त्यांच्यासमोर बाजू मांडल्याचे जिल्हाध्यक्ष रणजीत भोसले यांनी माहिती दिली.

धुळे शहरातील कचरा संकलनाची जबाबदारी धुळे महानगरपालिकेने स्वयंभू कंपनीला दिलेली आहे. परंतू शहरातील बहुतांश भागामध्ये कचरा हा रस्त्यांवर पडलेला असतो. शहरामध्ये विविध ठिकाणी घाणीचे मोठे साम्राज्य पसरलेले दिसून येते. स्वयंभू कंपनीकडून वेळेवर कचरा संकलन न झाल्यामुळे शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आलेले आहे. शहरातील विविध भागातील कॉलनी, परिसरामध्ये घंटागाडी येत नसल्यामुळे कॉलनी परिसरातील कचरा तसाच पडून राहतो. कॉलनी पसिरात चार दिवस घंटागाडी कचरा उचलण्यासाठी येत नाही. नागरिकांनी तक्रारी नोंदविल्यावर त्याची दखल सुध्दा घेतली जात नाही. कंपनीकडील घंटागाडीवर कार्यरत असलेले कर्मचारी घंटागाडीमध्ये वजन वाढविण्यासाठी माती, रेती, दगड भरुन त्याचे वजन करुन चूकीचे मोजमाप नोंदवून बिले मंजूर करुन घेतात. यामध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक भ्रष्टाचार होत आहे. सदर कचरा ठेकेदार हा अतिशय मनमानी पध्दतीने कारभार करीत आहे. यावेळी राष्ट्रवादी पक्षाच्या आंदोलकांना कचरा कंपनीचे मॅनेजर अभिजीत फडतरे यांनी बेताल वक्तव्य केले. धुळेकर जनताच घाण करते. धुळेकरांना वळण नाही असे बोलल्यामुळे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते जास्तच भडकले. त्यामुळे आंदोलन जास्तीच उग्र झाले. यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी कंपनीच्या मॅनेजरच्या तोंडाला काळे फासले. धुळेकर जनतेचा अपमान राष्ट्रवादी कार्यकर्ते सहन करणार नाही. धुळ्यात येवून पैसे कमवायचे आणि धुळ्याच्या लोकांवर नाव ठेवायचे असे चालणार नाही असे राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष रणजीत भोसले यांनी सांगितले. सदर कचरा ठेकेदार यांना योग्य समज देण्यात यावी. किंवा कचरा ठेकेदार त्वरीत बदलून त्या जागी नवीन ठेकेदाराची नियुक्ती करावी अशी मागणी धुळे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मागणी करण्यात आली.

हेही वाचा:

Back to top button