नाशिक : गोपीनाथ मुंडे हे ‘लोकनेते’ बिरुदाचे मुकुटमणी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | पुढारी

नाशिक : गोपीनाथ मुंडे हे ‘लोकनेते’ बिरुदाचे मुकुटमणी - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा
लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे यांनी समाजातील अठरापगड जातींसाठी काम केले. गोपीनाथ मुंडे हे आपल्या कामामुळे लोकनेते या बिरुदाचे मुकुटमणी होते, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

नांदूरशिंगोटे येथे शनिवारी (दि. 18) लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे यांचा पूर्णाकृती पुतळा व भव्य स्मारक गोपीनाथ गडाचे लोकार्पण झाल्यानंतर आयोजित कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. स्व. मुंडे हे शिवसेना-भाजप युतीचे शिल्पकार होते. त्यांचे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यावर प्रेम होते. मुंडे यांनी आयुष्यात खूप चढ-उतार पाहिले होते. त्यांचे संसदीय काम आणि वक्तृत्व प्रभावी होते. त्यांनी कष्टकर्‍यांना न्याय दिला. संघर्ष केला. आता आम्ही स्व. गोपीनाथ मुंडे व ना. नितीन गडकरी यांच्या विचारांचा आदर्श ठेवून काम करत असल्याची ग्वाही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली. स्व. गोपीनाथराव मुंडे हे सर्व पक्षांत लोकप्रियतेत आघाडीवर असल्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले. आमची संधी गेली. पण, तुम्ही मिळालेल्या संधीत चांगले काम करून दाखवा, असे आवाहन थोरात यांनी करताच उपस्थितांमध्ये हशा पिकला. उद्याच्या राजकारणात काय मिळेल माहीत नाही. पण, आज राजकीय जीवनातला सर्वोच्च आनंद मिळाला असल्याचे युवानेते उदय सांगळे यांनी प्रास्ताविकात सांगितले. स्व. मुंडे यांचे अपार प्रेम, स्वाभिमान व संघर्षाचा वारसा घेऊन पंकजा मुंडे यांची वाटचाल सुरू आहे. माजी आमदार स्व. गडाख, माजी मंत्री स्व. तुकाराम दिघोळे, स्व. एन. एम. आव्हाड यांनी सिन्नर तालुक्याचे अनेक प्रश्न मार्गी लावले आहेत. माजी आमदार राजाभाऊ वाजे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्हीही विकासाची कामे केली आहेत. आज मंत्री महोदयांकडे काहीही मागायचे नाही. कारण हा लोकनेत्याच्या सन्मानाचा दिवस असल्याचे त्यांनी नमूद केले. माजी आमदार राजाभाऊ वाजे यांनी आभार मानले. कार्यक्रमास नाशिक, नगर, बीडसह राज्यभरातून आलेले हजारो नागरिक उपस्थित होते.

आक्रमकतेवरचे झाकण योग्य वेळी काढू : पंकजा मुंडे

माजी मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या की, भगवानबाबांची भक्ती, शाहू, फुले, आंबेडकरांचे विचार आचरणात आणणारे, गोरगरीब जनतेसाठी झटणारे गोपीनाथ मुंडे यांचे स्मारक उभे राहात आहे, याचा अभिमान आहे. स्व. मुंडे आणि गडकरी यांची काम करण्याची पद्धत एकसारखीच. या ज्येष्ठ नेत्यांच्या विकासाचा वारसा पुढे चालवू असे आश्वस्त करून गोपीनाथ मुंडे यांच्या स्मरणार्थ ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी वसतिगृह, छत्रपती संभाजीनगर येथे दवाखाना उभारा, असे आवाहनही पंकजा मुंडे यांनी यावेळी केले. पत्रकार मला विचारतात, मुंडे साहेब आक्रमक होते. राजकीय संकटाच्या काळात ते कधीही शांत बसले नाहीत. तुम्ही इतक्या शांत कशा? मात्र, आक्रमकता माझ्यातही आहे. त्यावर झाकण ठेवले असून योग्यवेळी काढले जाईल, असा इशाराही पंकजा यांनी दिला. उदय सांगळे व त्यांच्या सहकार्‍यांचे पंकजा मुंडे यांच्यासह मान्यवरांनी कौतुक केले.

हेही वाचा:

Back to top button