80 फूट उंचीच्या बर्फाच्या भिंतीवर चढणारा मुलगा

वॉशिंग्टन : अमेरिकेतील लँडर्स गॅडोश नावाचा अवघ्या तेरा वर्षांचा मुलगा आईस क्लायंबिंगमध्ये थक्क करणारे कौशल्य दाखवतो. बर्फाच्या निसरड्या, गुळगुळीत भिंतीवर तो लिलया चढून जातो. केवळ ब्लेड आणि हातोडीचा वापर करून तो तब्बल 80 फूट उंचीची बर्फाची भिंतही चढून जातो. आईस क्लायंबिंगमध्ये तो वर्ल्ड चॅमिेयन आहे.
गेल्यावर्षी जानेवारीत स्वित्झर्लंडमध्ये आईस क्लायंबिंग वर्ल्ड यूथ चॅम्पियनशीप झाली होती. त्यामध्ये तो 80 फूट उंचीच्या बर्फाच्या भिंतीवर चढला होता. या इव्हेंटचे आयोजन इंटरनॅशनल क्लायंबिंग अँड माऊंटेनियरिंग फेडरेशनने केले होते. मोठमोठ्या धुरंधरांच्या उपस्थितीत हा मुलगा जिंकेल याची कुणालाही खात्री नव्हती; पण त्याने ते करून दाखवले. त्याला स्वतःला बर्फावर चढून जाण्यात मजा वाटते असे तो सांगतो. हे काम करीत असताना स्वतःवरच निर्भर राहावे लागते. त्यासाठी हळूहळू लय बनवावी लागते. आईस क्लायंबिंगमुळे नव्या नव्या ठिकाणी जाण्याची संधी मिळते व त्यामुळेही त्याला हे आवडते. अर्थातच त्याच्या या कौशल्यात त्याचे वडील जोनाथन गॅडोश यांचे मोठे योगदान आहे. त्यांनीच त्याला अगदी लहानपणापासून आईस क्लायंबिंगचे प्रशिक्षण दिले होते.