पुणे : रस्त्यासह पाणीपुरवठा, ड्रेनेजसाठीही तरतूद करा ; अतिरिक्त आयुक्तांच्या सूचना | पुढारी

पुणे : रस्त्यासह पाणीपुरवठा, ड्रेनेजसाठीही तरतूद करा ; अतिरिक्त आयुक्तांच्या सूचना

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  रस्त्याची वारंवार होणारी खोदाई रोखण्यासाठी नवीन रस्ते करण्यासाठी निधीची तरतूद करता त्याच ठिकाणी विद्युत, पाणीपुरवठा व ड्रेनेजच्या कामासाठीही निधीची तरतूद करावी. तसेच, रस्त्याचे काम सुरू करण्यापूर्वी इतर विभागांची कामे करावीत, अशा सूचना अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी केल्या आहेत. शहरात पावसाळ्यात रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडतात. पाइप लाइन तसेच अन्य सेवांसाठी वारंवार खोदाई केली जाते. खोदाईची कामे झाल्यानंतर योग्यप्रकारे रस्ते पूर्ववत करणे गरजेचे असते. मात्र, रस्ते योग्य पद्धतीने पूर्ववत केले जात नाहीत. शिवाय एकदा रस्ता खोदल्यानंतर तो पूर्ववत केल्यानंतर काही दिवसांतच पुन्हा रस्ते खोदाई केली जाते.

यंदा शहरातील अनेक भागांत समान पाणीपुरवठा योजना तसेच विविध सेवा वाहिन्यांच्या कामांसाठी मोठ्या प्रमाणावर खोदाईला परवानगी दिली आहे. ही परवानगी देतानाच सेवावाहिन्या टाकल्यानंतर रस्त्यांची दुरुस्ती वेळेत आणि दर्जेदार होतील, यासाठी नियोजन केले आहे. प्रामुख्याने शहराशी जोडणार्‍या महामार्गांसोबतच गर्दीच्या प्रमुख रस्त्यांवरील पाइप लाइन, इंटरनेट केबल, ड्रेनेज, पावसाळी गटारे, एमएनजीएल तसेच वीज वाहिन्यांची कामे प्राधान्यक्रमाने विहित मुदतीत करून घेण्यात येणार आहेत. त्यानंतरच रस्त्यांची दुरुस्ती व रिसर्फेसिंगची कामे केली जाणार आहेत.

समान पाणीपुरवठा योजनेच्या जलवाहिन्या आणि ड्रेनेजच्या वाहिन्या टाकण्यासाठी डांबरी रस्त्यासह सिमेंट काँक्रीटचे रस्तेही खोदण्याची वेळ प्रशासनावर येत आहे. त्यामुळे महापालिकेच्या अंदाजपत्रकात नवीन रस्त्यासाठी तरतूद करताना त्या प्रस्तावित रस्त्यावर विद्युत, पाणीपुरवठा व ड्रेनेजच्या कामासाठीही निधीची तरतूद करावी, तसेच रस्त्याचे काम सुरू करण्यापूर्वी ही कामे करावीत, अशा सूचना अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी केल्या आहेत.

Back to top button