नाशिक : एमआयडीसी करणार अडीच हजार एकर भूसंपादन | पुढारी

नाशिक : एमआयडीसी करणार अडीच हजार एकर भूसंपादन

नाशिक : सतीश डोंगरे

नाशिकचे प्रमुख औद्योगिक क्षेत्र समजल्या जाणाऱ्या सातपूर, अंबडमध्ये नव्या उद्योगांसाठी भूखंड उपलब्ध नसल्याने एमआयडीसीकडून जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागांत ९३८.४५ हेक्टर म्हणजेच सुमारे अडीच हजार हेक्टर भूसंपादन केले जाणार आहे. नाशिकमध्ये नव्या उद्योगांसाठी अत्यंत पोषक वातावरण असून, अनेक उद्योग नाशिकमध्ये येऊ पाहत आहेत. परंतु जागेचा प्रश्न असल्याने एमआयडीसीने भूसंपादनाचा निर्णय घेतला असून, लवकरच याबाबतची प्रक्रिया राबविली जाणार आहे.

सिन्नर तालुक्यातील मापारवाडी, दिंडोरी तालुक्यातील जांबूटके, नाशिक तालुक्यातील राजूरबहुला यासह घोटीमधील आडवण आणि मनमाड या भागात भूसंपादन केले जाणार आहे. सध्या याबाबतची प्रक्रिया सुरू असून, शेतकरीवर्गाशी चर्चा केली जात असल्याची माहिती समोर येत आहे. या विविध भागांपैकी राजूरबहुला उद्योगांसाठी हॉट डेस्टिनेशन ठरण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी एमआयडीसीने दिंडोरी तालुक्यातील तळेगाव अक्राळे येथे ३३७ हेक्टरवर औद्योगिक वसाहत विकसित करण्याचे नियोजन केले होते. बघता-बघता या वसाहतीत मोठे उद्योग उभे राहिले आहेत. अजूनही या वसाहतीत उद्योग येण्याचे प्रमाण सुरूच असून, लवकरच याठिकाणीसुद्धा उद्योगांसाठी भूखंड उपलब्ध होणे अवघड ठरू शकते. अशात एमआयडीसीने जिल्ह्यातील विविध भागांत औद्योगिक वसाहत निर्माण करण्याचे नियोजन सुरू केले असून, त्याकरिता हजारो एकर भूसंपादनाची प्रक्रिया राबविण्याची तयारी सुरू केली आहे.

दरम्यान, नव्या औद्योगिक वसाहतीच्या धोरणामुळे जिल्ह्यात मोठमोठ्या ग्रुपचे उद्योग येण्याची शक्यता आहे. सध्या बहुतांश उद्योगांकडून भूखंडासाठी एमआयडीसीकडे विचारणा केली जात असल्याची माहितीही समोर येत आहे.

राजूरबहुला शेवटच्या टप्प्यात

जागेची वाढती मागणी लक्षात घेता, नव्या औद्योगिक वसाहतीसाठी एमआयडीसीकडून नियोजन सुरू आहे. त्यात सिन्नरच्या मापारवाडी, दिंडोरी तालुक्यातील जांबूटके येथे आणि मुंबई-आग्रा महामार्गालगतच्या राजूरबहुला परिसरात भूसंपादन केले जाणार आहे. मापारवाडी आणि जांबूटके येथे पहिल्या टप्प्यात भूसंपादन होऊ शकेल, तर राजूरबहुला शेवटच्या टप्प्यात असेल.

रिलायन्सची एंट्री फायदेशीर

दिंडोरी तालुक्यातील अक्राळे औद्योगिक वसाहतीत रिलायन्स ग्रुपचा रिलायन्स लाइफ सायन्सेस हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आल्याने, नाशिक उद्योग जगताला त्याचा मोठा फायदा होताना दिसत आहे. या उद्योगाकडून जिल्ह्यात तब्बल २१०० कोटींची गुंतवणूक करण्यात आली आहे. तसेच इंडियन ऑइल कॉर्पोरेशननेदेखील या ठिकाणी ३५० कोटींची गुंतवणूक केली. या दोन मोठ्या उद्योगांमुळे इतरही उद्योग नाशिककडे आकर्षित होत आहेत.

असे करणार भूसंपादन

जांबूटके, दिंडोरी – ३१.५१ हेक्टर

मापारवाडी, सिन्नर – २३०.६७ हेक्टर

राजूरबहुला, नाशिक – १४४.४३ हेक्टर

घोटी (आडवण) – २६२.९७

मनमाड – २६८.८७

एकूण – ९३८.४५

हेही वाचा : 

Back to top button