महाळुंगे पडवळ : डिंभेच्या पाण्यामुळे तरारले बाजरीचे पीक | पुढारी

महाळुंगे पडवळ : डिंभेच्या पाण्यामुळे तरारले बाजरीचे पीक

महाळुंगे पडवळ; पुढारी वृत्तसेवा : हुतात्मा बाबू गेनू जलाशयाच्या (डिंभे धरण) डाव्या कालव्यातून घोड शाखा कालव्यात पाणी सोडल्यामुळे सुमारे एक हजार हेक्टरवरील उन्हाळी बाजरी पिकास लाभ झाला आहे. पीक जोमाने वाढण्यास मदत झाल्याने शेतकर्‍यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. लौकी गावासह परिसरातील दहा गावे व वाड्या-वस्त्यांवरील नागरिकांचा पिण्याचा पाणी प्रश्न सुटण्यास मदत झाली आहे.

कळंब- गणेशवाडी (ता. आंबेगाव) येथून डाव्या कालव्यातून घोड शाखा कालव्यात पाणी सोडण्यात आले आहे. कळंब गावाचा काही भाग, लौकी, थोरांदळे, भराडी, जाधववाडी, नागापूर व जुन्नर तालुक्यातील मांजरवाडी या गावांना पाणीटंचाई जाणवत होती. परिसरातील बंधारे व पाझर तलाव कोरडे पडण्याच्या मार्गावर होते. विहिरींनी तळ गाठायला सुरवात केली होती.

गुरांचा चारा तसेच बाजरी गहू, कांदा, मका आदी पिकांना पाणी कमी पडत होते. पाणी सोडण्याची मागणी केली जात होती. कालव्याला वेळेवर पाणी सोडल्याने शेतकर्‍यांनी समाधान व्यक्त केले. घोड शाखा कालव्यातील पाणी शेवटच्या टप्प्यापर्यंत गेले आहे. पाण्याचा वापर काटकसरीने करावा, असे आवाहन कुकडी पाटबंधारे विभाग क्रमांक 1 चे कार्यकारी अभियंता प्रशांत कडूसकर, उपअभियंता दत्ता कोकणे यांनी केले आहे.

Back to top button