आंबेगावच्या पूर्वेला भुरट्या चोर्‍या वाढल्या; चार दुकाने फोडली | पुढारी

आंबेगावच्या पूर्वेला भुरट्या चोर्‍या वाढल्या; चार दुकाने फोडली

पारगाव(ता. आंबेगाव) : पुढारी वृत्तसेवा : तालुक्याच्या पूर्व भागात भुरट्या चोर्‍यांचे प्रमाण वाढले आहे. बुधवारी (दि. 1) पहाटे कारफाटा, रांजणी येथील चार दुकाने चोरट्यांनी फोडली. एका दुकानाचे शटर उचकटण्याचा प्रयत्न फसला. या घटनांमुळे छोट्या व्यवसायिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. रांजणी गावठाण ते कारफाटा येथील श्रीराम चौकादरम्यान असलेल्या माऊली कृषी सेवा केंद्र या दुकानाचे शटर उचकटण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला. परंतु त्यांचा प्रयत्न फसला.

त्यानंतर चोरट्यांनी कारफाटा येथील जय मल्हार अ‍ॅग्रो सर्व्हिसेस, शेतकरी कृषी सेवा केंद्र आणि शेतकरी कृषी उद्योग या दुकानांचे मागील बाजूचे पत्रे उचकले. तसेच, राजलक्ष्मी मेडिकलचे शटर चोरट्यांनी उचकटण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यांना आता शिरता आले नाही. दुकानांमधील चिल्लर चोरट्यांनी लंपास केली. याच दिवशी वळती गावातील अमोल तुकाराम भोर यांच्या घरासमोर लावलेली दुचाकीदेखील चोरट्यांनी चोरून नेली आहे. कारफाटा येथील दुकाने फोडण्याच्या घटना अनेकदा घडल्या आहेत. या भुरट्या चोर्‍यांच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने छोटे व्यावसायिक, नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. पोलिसांनी या चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.

Back to top button