नाशिक : महागाई गगनाला भिडली; कोणीही समजेना बळीराजाची व्यथा, पीक घेणेही दिवसेंदिवस मुश्कील | पुढारी

नाशिक : महागाई गगनाला भिडली; कोणीही समजेना बळीराजाची व्यथा, पीक घेणेही दिवसेंदिवस मुश्कील

नाशिक (कवडदरा)  : पुढारी वृत्तसेवा
महागाईमुळे पीक घेणे सोडा, मशागत करणेही वर्षभर कठीण होत चालल्याचे चित्र सध्या इगतपुरी तालुक्यातील साकूर, शेणित, कवडदरा या भागात पहायला मिळत आहे.

आधुनिक युगात शेती व्यवसाय करताना बैल जोडी संभाळणे दुरापास्त होत चालले आहे. कारण बैलाला चारा विकत घेणे शेतकर्‍यांना परवडेना झाले आहे. तर दुसरीकडे कडबा, पेंडीचे भाव आता गगनाला भिडले आहेत. त्यामुळे उसनवारी करूनच शेतकरी यांत्रिक शेतीला प्राधान्य देताना दिसत आहेत. त्यात पाणीटंचाईचे सावट अनेकदा तीव्र होत असते. परिणामी शेतकरी शेतात नवनवीन प्रयोग करत कुटुंबाचा गाडा हाकत आहे. काही शेतकर्‍यांच्या अंगणात दिसणार्‍या बैल जोडीची जागा आता ट्रॅक्टरसारख्या यंत्राने घेतली असून नांगरणी पेरणी व इतर शेती मशागतीची कामे पारंपरिक पद्धतीने करत आहेत. शेतात कष्ट करून पिकांना म्हणावा तेवढा मोबदला मिळत नाही. त्यामुळे दिवसेंदिवस शेती करणे परवडत नाही, असे ज्येष्ठ शेतकरी रघुनाथ उगले यांनी सांगितले. यामुळे ट्रॅक्टर हाच यांत्रिक शेतीचा केंद्रबिंदू बनत चाललेला आहे. 10 – 12 वर्षांपूर्वी ट्रॅक्टरचा वापर हा मर्यादित होता. परंतु आता पारंपरिक शेतीला फाटा देऊन काही शेतकरी आधुनिकतेची कास धरू लागला आहे.

शेतात नांगरणीपासून पीक निघेपर्यंत शेतकर्‍यांना पैसा खर्च करावा लागतो. पेरणीपूर्व मशागतीसाठी शेतकर्‍यांना नांगरणी करून मशागत करून पेरणी करावी लागते. प्रत्येक पिकाला काढणीपर्यंत अधिक खर्च येतो. पीक आल्यानंतर योग्य तो भाव मिळत नाही. त्यामुळे उत्पादनापेक्षा खर्च अधिक अशी परिस्थिती आहे. -कचरू निकम, ज्येष्ठ शेतकरी.

डिझेलचे दर कमी होणे गरजेचे…
डिझेलचे दर वाढत असल्याने ट्रॅक्टरचे भाडे दिवसागणिक वाढत चालले आहे. त्यामुळे शेतीच्या मशागतीचा खर्च दिवसेंदिवस वाढत आहे. मशागतीसाठी उसनवारी करावी लागत आहे. सरकारने पेट्रोल व डिझेलचे दर कमी करावे अशी शेतकर्‍यांची मागणी आहे.

केंद्र व राज्य शासनाच्या योजना शेतकर्‍यांसाठी फायदेशीर ठरत असून योजनेचा लाभ घेऊन शेतकरी आता अनुदानावर ट्रॅक्टरसह विविध अवजारे व उपकरणे खरेदी करत आहेत. -अशोक कदम, शेतकरी.

हेही वाचा:

Back to top button