नगर : सराफ बाजारात महापालिकेच्या मीटरमधून वीजचोरी..! | पुढारी

नगर : सराफ बाजारात महापालिकेच्या मीटरमधून वीजचोरी..!

सावेडी : पुढारी वृत्तसेवा : सराफ बाजार परिसरातील रस्त्यावर अडथळा करणार्‍या खाद्यपदार्थ, फ्रुटवाले, टपर्‍याचे अतिक्रमणे मंगळवार (दि.28) हटविण्यात आली. रस्त्याच्याकडेच्या हातगाड्या व बंद असलेली पाणपोई जमिनदोस्त करण्यात आली. कारवाई दरम्यान आयुक्त डॉ. पंकज जावळे यांना महापालिकेच्या मीटरमधून वीजचोरी निदर्शनास आली. त्यांनी तत्काळ कारवाईचे आदेश दिले. शहरातील मुख्य बाजारापेठेतील रस्त्यांवर दुतर्फा खाद्यपदार्थाच्या हातगाड्यासह, फळगाड्या पानाच्याटपर्‍या टाकून व्यवसाय थाटल्याने नागरिकांना चालणे मुश्कील होेते. सराफ बाजाराच्या प्रवेशद्वारावर हातगाड्या, दुचाकी लावल्याने अडथळा ठरत असल्याच्या तक्रारी आयुकांकडे आल्या होत्या.

महापालिका आयुक्त पंकज जावळे, उपायुक्त श्रीनिवास कुर्हे, उपमहापौर गणेश भोसले यांच्या उपस्थितीत अतिक्रमण प्रमुख रोहिदास सातपुते, उपअभियंता श्रीकांत निंबाळकर, उद्यान विभागप्रमुख शशिकांत नजान, विद्युत विभागप्रमुख वैभव जोशी, घनकचरा विभागप्रमुख किशोर देशमुख, क्षेत्रीय आधिकारी इंगळे आदींच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग समिती कर्मचार्‍यांच्या पथकाने मंगळवारी सकाळी आठ वाजता कारवाई करण्यास सुरुवात केली.

गंजबाजारात दुकानासमोर लावलेली जाहिरातीचे फलक, हातगाड्या हटविण्यासोबतच रस्त्यावरील अतिक्रमण जमिनदोस्त करण्यात आले. स्वच्छता मोहिमेतंर्गत कचर्‍याचे ढीग उचलण्यात आले. दरम्यान, काही व्यावसायिक महापालिकेच्या विद्युत कनेक्शनवरून राजरोजसपणे विजेची चोरी केल्याचे आयुक्त डॉ. पंकज जावळे यांच्या निदर्शनास आले. आयुक्त जावळे यांनी विद्युत विभागाच्या अधिकार्‍यांना वीज कनेक्शन तोडून संबंधितांवर कारवाईचे आदेश दिले.

Back to top button