धुळे : चारित्र्याच्या संशयावरुन महिलेचा गळा आवळून खून

धुळे : चारित्र्याच्या संशयावरुन महिलेचा गळा आवळून खून

धुळे, पुढारी वृत्तसेवा : शहरातील जमनागिरी परिसरात असलेल्या बजरंग चौकातील एका घरात ३५ वर्षीय महिलेचा मृतदेह आढळून आला. या महिलेसोबत राहणाऱ्या तरूणानेच तिचा खून केला असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला असून आरोपीचा शोध सुरू आहे. दरम्यान, या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक काशिनाथ नगराळे यांच्या घरात विनोद सोहीके आणि नीता गांगुर्डे (सोहीके) भाडेकरू म्हणून  राहत होते. चारित्र्या संशयावरून दोघांमध्ये नेहमी वाद होत होते. काल रात्री दोघांमध्ये जोरदार भांडण झाल्याने त्यात नीताचा गळा आवळून विनोद उर्फ बादल सोहीकेने खून केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. आज जमनागिरी भागात पाणी आले असल्याचे निता सोहीकेला घरासमोर राहणारी मुलगी सांगायला गेली. या मुलीने अंथरुणात निता सोहीके हिचा मृतदेह पाहिल्याने ती घाबरली. तिने ही माहिती लागलीच शेजारच्या लोकांना दिली.

घटनेची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक ऋषिकेश रेड्डी, धुळे शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांचासह शहर पोलीस ठाण्याचे पथकासह फॉरेन्सिक टीम घेऊन दाखल झाले. घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला.
विनोद सोहीके हा धुळे महानगरपालिकेत सफाई कर्मचारी म्हणून कार्यरत आहे. तो ड्युटी झाल्यानंतर रिक्षा चालक म्हणून काम करत असल्याची माहिती परिसरातून मिळाली आहे. या प्रकरणात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित विनोद आपल्याला ताब्यात घेण्यासाठी पोलिसांनी हालचाली सुरू केल्या आहेत.

हेही वाचलंत का?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news