नाशिक : नांदगावी नायलॉन मांजा विक्रेत्यांवर तडीपारीचा बडगा | पुढारी

नाशिक : नांदगावी नायलॉन मांजा विक्रेत्यांवर तडीपारीचा बडगा

नाशिक (नगरसूल) : पुढारी वृत्तसेवा
येवला तालुक्यातील नगरसूलसह ग्रामीण भागातही मकरसंक्रांत उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जात असतानाच पतंगबाजीसाठी नायलॉन मांजाचा वापर मोठ्या प्रमाणात होत असल्याने त्यावर शहरी भागातील पोलिसांप्रमाणे ग्रामीण पोलिसांनीदेखील कठोर कारवाई करावी अशी मागणी पक्षिमित्रांकडून होत आहे.

नायलॉन मांजाची सर्रास विक्री करणार्‍या दुकानदारांवर गुन्हे दाखल करण्यात येऊन तडीपार करण्यात येणार असल्याची नोटीस येवला शहराप्रमाणे ग्रामीण भागातही देण्यात यावा. मकरसंक्रांतीचा सण काही दिवसांवर येऊन ठेपला असताना नायलॉन मांजाचा होणारा वापर होण्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी संबंधित विक्रेत्यांना कलम 149 अन्वये येवला शहर पोलिस ठाण्याप्रमाणे ग्रामीण भागातही नोटिसा द्याव्यात अशी मागणी पक्षिमित्र करीत आहेत. मकरसंक्रांत सण जवळ आल्याने पतंगाबाबतची उत्सुकता पाहाता नायलॉन मांजाचा वापर सर्रास करण्यात येत आहे. त्यामुळे नायलॉन मांजाच्या वापरामुळे ग्रामीण भागात झाडावर अडकलेल्या कित्येक पक्ष्यांना अडकून त्यांना जीव गमवावा लागला. निदर्शनास आलेल्या अनेक पक्ष्यांना पक्षीमित्रांनी जीवदान दिले. या मांजामुळे येवला शहरात पाच ते सहा युवक जखमी झाले आहेत. यातून कुणाच्या गळ्याला तर कुणाच्या पायाला गंभीर जखमा झाल्या आहेत. मकरसंक्रांतीनिमित्त नायलॉन मांजामुळे कोणत्याही व्यक्तीला गंभीर स्वरूपाची इजा होऊ नये, यासाठी पोलिसांनी कडक कारवाई करण्याची मागणी पक्षिमित्र करीत आहेत. विशेष म्हणजे पक्ष्यांना अकाशात तसेच झाडा- झुडपांवर असलेला मांजा दिसून येत नसल्याने यात अडकून जखमी होऊन पक्षी मृत्युमुखी पडत आहेत.

नायलॉन मांजामध्ये अडकून जखमी झालेले पक्षी जेव्हा आम्ही रेस्क्यू करतो, तेव्हा अक्षरश: डोळ्यातून पाणी येते आणि शरीरावर शहारे येतात. अनेकदा पक्ष्यांच्या इवल्याशा मानेला नायलॉन मांजाचा फास बसलेला असतो आणि त्यांची त्वचाही चिरलेली असते. या पक्ष्यांवर शुश्रूषा करणेही मोठे आव्हान ठरते. ह्यामुळे दुर्मीळ पक्षीही यात मरण पावतात, तरी पतंगप्रेमींना हात जोडून विनंती करतो की, नायलॉन मांजावर बंदी घालावी. -महेश जगताप, पक्षिमित्र, नगरसूल.

हेही वाचा:

Back to top button