परिंचे : भक्तांना श्रीनाथांच्या यात्रा उत्सवाची ओढ | पुढारी

परिंचे : भक्तांना श्रीनाथांच्या यात्रा उत्सवाची ओढ

परिंचे; पुढारी वृत्तसेवा : संपूर्ण महाराष्ट्रात अत्यंत जागृत असे तीर्थस्थान म्हणून श्रीक्षेत्र वीर (ता. पुरंदर) येथील श्रीनाथ म्हस्कोबा व माता
जोगेश्वरी विख्यात आहेत. श्रीनाथ जोगेश्वरींचा यात्रा उत्सव महाराष्ट्रातील सर्व भक्तांसाठी एक आनंदाची पर्वणीच असते. यात्रा काळात श्रीनाथांच्या दर्शनासाठी महाराष्ट्रासह कर्नाटक, मध्य प्रदेश, गुजरात असे वेगवेगळ्या राज्यातील श्रीनाथांचे भक्त आवर्जून उपस्थिती लावत असतात. या यात्रा उत्सवाची आता भाविकांना ओढ लागली आहे.

लाखोंचा समुदाय यात्रा काळामध्ये श्रीक्षेत्र वीर येथे येत असतो. त्या दृष्टीने वीर देवस्थान ट्रस्ट व वीर ग्रामपंचायत सर्वतोपरी चोख व्यवस्था करत असतात. गेली दोन वर्षे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यात्रा काळात अनेक नियम व निर्बंध लागू असल्याने यात्रेवर बंधने निर्माण झाली होती, परंतु या वेळेस निर्बंधमुक्त यात्रा होणार असल्याने लाखो भक्तांची येण्याची शक्यता आहे.

श्रीनाथ म्हस्कोबा व माता जोगेश्वरी यांच्या लग्नाचे पहिले आमंत्रण भक्त कमळाजींना चुडी पौर्णिमेच्या दिवशी वाजतगाजत सर्व लवाजम्यासहित देण्यात आले. यात्रेच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने प्रशासन, आरोग्य विभाग, महावितरण अशा विभागांकडे विविध परवानग्या मागण्यात आल्या असून, महाराष्ट्र पोलिस फाउंडेशन कमांडो यांचीदेखील जादा कुमक मागवण्यात आली आहे. मंदिराच्या चारही बाजूने सुसज्ज अशी पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे. बाहेरगावाहून येणार्‍या भक्तांसाठी सुसज्ज असे भक्त निवासही तयार आहे.

परंपरेनुसार वीर यात्रेकरिता अनेक भाविक बैलगाडी घेऊन येत असतात. बैलगाडी घेऊन येणार्‍या भाविकांनी आपल्या बैलगाड्या पार्किंगच्या शेजारीच थांबवायचे असून पार्किंगपासून मंदिरापर्यंत भक्तांची जाण्याची मोफत सोय करण्यात येणार आहे.
यात्रेकरूंना सर्व सुखसोयी उपलब्ध करून भक्तांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही, यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करणार आहोत, असे देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष संतोष धुमाळ यांनी सांगितले.

यात्रा काळात महिलांसाठी व लहान मुलांच्या आरामासाठी ’आईसाहेब जोगेश्वरी कक्षही’ निर्माण करण्यात येणार आहे, असे विश्वस्त सचिव अभिजित धुमाळ यांनी सांगितले. यात्रा काळात व्यसनमुक्त मंदिर परिसर धोरण कठोरपणे राबवणार असून यासाठी पोलिस मित्र, स्वयंसेवक व गावातील तरुण मित्रमंडळ यांचाही सहभाग घेणार असल्याचे खजिनदार अमोल धुमाळ यांनी सांगितले. या वेळी ट्रस्टचे अध्यक्ष संतोष धुमाळ, बाबूकाका धुमाळ, मधुआबा धुमाळ, अरुण धुमाळ तसेच अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.

 

Back to top button