नगर : मांजापासून संरक्षणासाठी वज्रकवच ; डॉ. अमोल बागूल यांचे संशोधन | पुढारी

 नगर : मांजापासून संरक्षणासाठी वज्रकवच ; डॉ. अमोल बागूल यांचे संशोधन

 नगर : पुढारी वृत्तसेवा :  नायलॉन, चिनी मांजापासून दुचाकीस्वारांना संरक्षण मिळावे. रस्तालुटीच्या प्रकरणात काही ठिकाणी आडव्या तारा बांधल्या जातात, त्यापासून संरक्षण व्हावे, यासाठी राष्ट्रीय पदकाने सन्मानित संशोधकडॉ. अमोल बागुल यांनी वज्रकवच संरक्षित जॅकेट तयार केले आहे. त्यामुळे अनेक अपघात टळण्यास मदत होणार आहे. भारताच्या संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेला वज्रकवचचे संशोधन डॉ. बागूल यांनी सादर केले आहे. या संकल्पनेच्या निर्मितीचे पेटंट, ट्रेडमार्क, कॉपीराईट तसेच आयएसओ प्रमाणीकरण व अधिकार जगभरातील जॅकेट व दुचाकीनिर्मिती कंपन्यांना मानवतेच्या दृष्टिकोनातून मोफत देण्याचे डॉ. बागुल यांनी जाहीर केले आहे.

डोक्यापासून कंबरेपर्यंत उंची असलेल्या व काही सेकंदांत अंगात घालता येणार्‍या वज्रकवच जॅकेटमध्ये हाय डेन्सिटी पॉलिप्रॉपीलीन या प्लास्टिकसदृश्य मजबूत पदार्थाचा तसेच हीटलॉनचा वापर करण्यात आला आहे. चेहरा झाकण्यासाठी घडी करण्याजोगता मुखवटा डकवलेला आहे. जॅकेटवर रात्री चमकणारे रेडियम डकवण्यात आले आहे. त्यावर मांजा अडकून तुटण्यासाठी अणकुचीदार खाचा देखील तयार करण्यात आल्या आहेत. त्याचे वजन 200 ग्रॅम असून वॉटरप्रूफ आहे. पुरुषांसाठी कांत, स्त्रियांसाठी कांता व लहान मुलांसाठी अंगज अशा तीन प्रकारात वज्रजॅकेटची डॉ. बागूल यांची संकल्पना आहे. त्यासाठी अंदाजे खर्च 100 रुपये येतो. ऊन, वारा, पाऊस, धूळ तसेच कीटकांपासून देखील दुचाकीस्वाराचे वज्रकवचमुळे संरक्षण होणार आहे.

डॉ. बागूल यांच्या या संशोधनाच्या संकल्पनेनुसार इंजिनिअर नीलेश पठारे, उद्योजक सुनील मोरे यांनी डॉ. बागुल यांना वस्तू संशोधन निर्मितीत महत्त्वाचे मार्गदर्शन केले. तंत्रज्ञ आकाश गायकवाड यांनी सहकार्य केले. हे संशोधन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, यांच्यासह रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय यांना ऑनलाईन पाठवले आहे. ळ

Back to top button