जुने नाशिकच्या फकीरवाडी भागातील घर शॉर्ट सर्किटच्या आगीत खाक | पुढारी

जुने नाशिकच्या फकीरवाडी भागातील घर शॉर्ट सर्किटच्या आगीत खाक

जुने नाशिक : पुढारी वृत्तसेवा

येथील अमरधाम रस्त्यालगत फकीरवाडी भागात दरबाररोड वरील झोपडपट्टीतील एका घरात शॉर्ट सर्किटमुळे सोमवारी, दि.7 दुपारी बारा वाजता आग लागल्याची घटना घडली आहे.

सुदैवाने घर बंद असल्यामुळे मोठा अनर्थ टळला. अग्निशमन दलास माहिती मिळताच ताबडतोब शिंगाडा तलाव येथील अग्निशमन दल कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. अत्यंत दाट लोकवस्ती व अरुंद गल्लीबोळ असा परिसर असल्याने आगीवर नियंत्रण आणण्यासाठी काही प्रमाणात अडथळे आले. परंतु या अडचणींवर मात करत अग्निशमन दलाचा बंब दरबाररोडने टेकड्यावरती नेऊन थांबविण्यात आला. तेथून घटनास्थळापर्यंत अग्निशमन दलाच्या लोकांनी पाईप लावून पाण्याचा मारा करत घराला लागलेली आग विझवली आहे. आग लागल्याने परिसरात धुरांचे लोट पसरले होते.

आग लागलेल्या घरातील फ्रिज, कपाट संसार उपयोगी अन्य वस्तू जळून खाक झाले असून यामध्ये सलीम खान, लतीफ खान आणि आतिख खान अशा तिघांच्या कुटुंबीयांचा संसार रस्त्यावर आला आहे. कुटुंबातील सर्व मंडळी सोमवारी, दि.7 सकाळीच साडेसहा वाजता घर कुलूप बंद करून ओळखीच्या विवाह कार्यक्रमासाठी पाचोराच्या दिशेने रवाना झाले होते. त्यामुळे घरात कोणीही नव्हते. घटना घडली तेव्हा कुटुंबीय पिंपळगाव बसवंतपर्यंत पोहोचलेले होते. त्यांना रहिवाशांनी माहिती कळविली असता पुढील प्रवास थांबून पुन्हा घराकडे परतीचा प्रवास सुरू केला आहे. अग्निशमन दलाचे दोन बंब घटनास्थळी पाचारण करण्यात आले असून पाण्याचा मारा करून संपूर्ण आग विझविण्यात आली. भद्रकाली पोलिसांनी दरबाररोड परिसराकडे जाणारा रस्ता वाहतुकीसाठी बंद केला. तसेच बघ्यांच्या गर्दीवर नियंत्रण ठेवले. त्यामुळे आपत्कालीन कार्य सुरळीतपणे पार पडले. लोकवस्तीचा हा परिसर असल्याने मोठी दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त केली जात होती. मात्र अग्निशमन दलाने वेळीच दाखल होऊन संभाव्य धोका टळल्याने रहिवाशांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.

हेही वाचा:

Back to top button