चांद्याच्या सरपंच ज्योती जावळे यांचा राजीनामा | पुढारी

चांद्याच्या सरपंच ज्योती जावळे यांचा राजीनामा

 कुकाणा : पुढारी वृत्तसेवा : नेवासा तालुक्यात राजकीय दृष्ट्या महत्त्वाच्या चांदा ग्रामपंचायतीच्या सरपंच ज्योती दीपक जावळे यांनी राजीनामा दिला आहे. आता या पदी कोणाची वर्णी लागते, याकडे नेवासा तालुक्याचे लक्ष लागले आहे. चांदा ग्रामपंचायतीची निवडणूक 2019 मध्ये झाली. ग्रामपंचायतीत 17 सदस्य असून, निवडणुकीच्या वेळी नेवाशाचे माजी सभापती कारभारी जावळे, मराठा महासंघाचे संभाजी दहातोंडे, अनिल अडसुरे यांची आघाडी होऊन त्यांनी निवडणूक एकत्र लढवली. त्यात आघाडीला 13 तर विरोधी भाजपला 4 जागा मिळाल्या होत्या.

असे असताना सरपंचपदाच्या निवडीवरून आघाडीमध्ये त्यावेळी मोठी ओढाताण होऊन सरपंचपद इतर मागास प्रवर्गासाठी राखीव असल्याने प्रथम सरपंचपदी माजी सभापती कारभारी जावळे यांच्या सूनबाई ज्योती जावळे यांची वर्णी लागली. अनपेक्षित विरोधी भाजपला उपसरपंचपदाची संधी मिळाली होती. परंतु, गेल्या 15 ते 20 दिवसांपूर्वी भाजपचे उपसरपंच चांगदेव नारायण दहातोंडे यांचा राजीनामा घेऊन तो मंजूर करण्यात आला. त्यांच्या जागी नूतन वर्षा सागर जावळे यांची निवड करण्यात आली. त्या पाठोपाठ सरपंच ज्योती जावळे यांनी राजीनामा दिल्याने पुन्हा सरपंच पदासाठी राजकीय हालचाली सुरू झाल्या आहेत.

मागच्या वेळी या पदावरून झालेली ओढाताण लक्षात घेता, यावेळी सरपंचपदी कोणाची वर्णी लागते, याची उत्सुकता लागली आहे. सध्या राज्यभर मराठा महासंघाचे काम करीत असल्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या सरकार सोबत असल्याने चांद्याच्या सरपंचपदासाठी मला आग्रह केला जात आहे. परंतु मला स्थानिक राजकारणात इच्छा नसल्यामुळे मी स्थानिक कार्यकर्त्यांशी चर्चा करून सरपंचपदाबाबत निर्णय घेणार आहे.
संभाजी दहातोंडे, राष्ट्रीय सरचिटणीस, मराठा महासंघ

राजकारणात शब्दाला महत्त्व असते. त्यामुळे ठरल्याप्रमाणे आम्ही माजी सभापती सुनीता गडाख यांच्याशी चर्चा करून मुदतीत राजीनामा दिला आहे त्यांच्याच मार्गदर्शनाखाली पुढील सरपंच पदाची निवड केली जाईल.
                                                                -कारभारी जावळे, माजी सभापती

Back to top button