सोमेश्वरनगर : चारींच्या दुरुस्तीअभावी पाणी नागरी वस्तीत | पुढारी

सोमेश्वरनगर : चारींच्या दुरुस्तीअभावी पाणी नागरी वस्तीत

सोमेश्वरनगर; पुढारी वृत्तसेवा : मुरुम (ता. बारामती) अंतर्गत येणार्‍या साळोबा वस्तीवरील चारींच्या कामांची दुरुस्ती कित्येक वर्षांपासून रखडल्याने पावसाचे पाणी नागरी वस्तीत, प्रसंगी घरातही जात आहे. येथील ग्रामस्थांनी कित्येक वर्षांपासून या चारींची कामे करण्याची मागणी असूनही प्रशासनाला जाग येत नाही. वारंवार दुरुस्तीची मागणी करूनही कामे होत नसल्याने ग्रामस्थ हतबल झाले आहेत. ना ग्रामपंचायत याकडे लक्ष देते, ना नेते, ना सरकारी अधिकारी अशी स्थिती आहे. शेजारील गावातील चारी व ओढ्यांची कामे दरवर्षी होतात; मात्र मुरुम येथील चारींच्या कामाला आजपर्यंत मुहूर्त मिळाला नाही.

चालू वर्षी बारामतीच्या पश्चिम भागात आजपर्यंतच्या सर्वाधिक पावसाची नोंद झाली. रस्त्याच्या बाजूला असलेल्या चारींची कामे झाली नसल्याने पावसाचे पाणी थेट ग्रामस्थांच्या घरात घुसले होते. रात्रभर गुडघाभर पाण्यात ग्रामस्थांनी रात्र घालवली होती. साधारण दोन किलोमीटर अंतर असलेल्या चारींत गवत, गाळ, झाडाझुडपांनी बुजल्या आहेत. त्यामुळे पावसाचे पाणी ओढ्याला जाण्यास अडथळा निर्माण होतो. चारींत पाणी बसत नसल्याने ते थेट घरात घुसते. त्यामुळे येथील ग्रामस्थ, महिला, मुलांना विविध अडचणींचा सामना करावा लागतो. पावसाच्या पाण्यामुळे या परिसरातील रस्त्यांचीदेखील पूर्ण वाट लागली आहे. रस्तेही दुरुस्त करण्याची गरज आहे. मुरूमची निवडणूक तोंडावर असल्याने चारींची दुरुस्ती होईल, अशी अपेक्षा साळोबा वस्तीवरील ग्रामस्थांना आहे.

Back to top button