नाशिक : ऐन दिवाळीत बळीराजाच्या डोळ्यांत पावसाने ‘पाणी’ | पुढारी

नाशिक : ऐन दिवाळीत बळीराजाच्या डोळ्यांत पावसाने ‘पाणी’

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

जिल्ह्यात बहुतांश तालुक्‍यांत गेल्या चार दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे टोमॅटो, मका, भाजीपाला पिके, भात, सोयाबीन, कांदा आणि नवीन कांदा रोपे यांचे मोठे नुकसान झाल्यामुळे बळीराजा अडचणीत सापडला आहे. तसेच छाटणी केलेल्या द्राक्षबागादेखील सततच्या पावसामुळे खराब होत आहेत. गेल्या चार दिवसांपासून दररोज रात्री धो-धो कोसळणाऱ्या पावसाने गुरुवारी (दि. २०) पहाटे तर कहर करत हंगामावरच जव‌ळपास पाणी फेरल्याने शेतकऱ्यांचे उत्पन्न जवळपास बुडाल्यात जमा झाले आहे. त्यामुळे ऐन दिवाळीत बळीराजाच्या डोळ्यांत अश्रू अशी स्थिती आहे.

तालुक्यात नवरात्रीनंतर काही दिवस पावसाने उघडीप दिली. परंतु चार दिवसांपासून जिल्ह्यात परतीचा पाऊस सुरू आहे. सिन्नर, येवला, त्र्यंबकेश्वर, दिंडाेरी, इगतपुरी आदी तालुक्यांना पावसाने झोडपून काढले आहे. अन्यही तालुक्यांत त्याचा जोर अधिक आहे. शेतकरीवर्गाने मोठ्या अडचणीतून उभी केलेली पिके सततच्या पावसाने खराब झाल्याने शेतकरीवर्ग कोलमडला आहे.

मान्सूनचा जोर ओसरला असे वाटत असल्याने अनेक शेतकऱ्यांनी मका पिकाची कापणी करण्यास सुरुवात केली होती. त्यातच पहाटे पावसाचे आगमन झाले आणि होत्याचे नव्हते झाले. शेतातच पडलेली कणसे पावसाने पूर्णतः भिजून गेली असून, काहींच्या शेतातील कणसे पाण्याबरोबर वाहून गेली आहेत. त्यामुळे चारा आणि कणसांचे अतोनात नुकसान झाले आहे.

परतीच्या पावसाने जिल्ह्यात थैमान घातलेले असताना प्रमुख धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही पाण्याची आवक वाढली आहे. त्यामुळे गंगापूरची दारे पुन्हा उघडण्यात आली असून, धरणातून ५७१ क्यूसेक विसर्ग सुरू झाला आहे. तसेच दारणा, पालखेडसह अन्य प्रकल्पांमधून मोठ्या प्रमाणात पाणी साेडण्यात आल्याने पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. इगतपुरी तालुक्याला पावसाने दणका दिला असून, तालुक्यातील प्रमुख धरणांमध्ये वेगाने आवक होत आहे. त्यामुळे दारणामधून १,१००, मुकणेतून २५०, कडवामधून ८४८, वालदेवीतून ६५ क्यूसेक विसर्ग केला जातोय. याशिवाय भोजापूरमधून २,३९८ तर पालखेडचा ३,४९६ क्यूसेक विसर्ग सुरू आहे. दरम्यान वरील धरणांतून सुरू असलेल्या विसर्गामुळे नांदूरमध्यमेश्वर धरणातून १४ हजार ६९० क्यूसेक वेगाने पाणी मराठवाड्याकडे झेपावत आहे.

अतिवृष्टीमुळे पाथरे जलमय
वावी : अतिवृष्टीमुळे पाथरे परिसरात शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कांदा, सोयाबीन, द्राक्षबागा, ऊस, भुईमूग, टोमॅटो व भाजीपाला यासारख्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, जि. प. सदस्या सीमंतिनी कोकाटे यांनी परिसरात पाहणी दौरा करत, तलाठ्यांना पंचनामे करण्यास सांगितले.

हेही वाचा:

Back to top button