‘मुळा’चा विसर्ग 15 हजार क्यूसेक | पुढारी

‘मुळा’चा विसर्ग 15 हजार क्यूसेक

राहुरी : पुढारी वृत्तसेवा :  मुळा धरणाच्या लाभक्षेत्रात जोरदार पावसाने धुमाकूळ घातल्याने विसर्ग वाढविण्यात आला आहे. 15 हजार क्यूसेकने मुळा नदीचा प्रवाह वाहता झाला आहे. यंदाच्या मान्सून हंगामात विक्रमी 22 हजार दलघफू इतके पाणी जायकवाडी धरणाला मुळातून सोडण्यात आले. मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्राकडून आवक एक हजार 100 क्यूसेक इतकी अत्यल्प आहे; परंतु म्हैसगाव, शेरी चिखलठाण, साकूर, मांडवे, पारनेर हद्दीतील भाळवणी, काळू प्रकल्प, मांडओहोळसह मुळानगर व परिसरातील जोरदार पावसाने धरणाच्या पाणी साठ्यात भरमसाठ वाढ होत असल्याने मुळा धरण पाटबंधारे विभागाने तत्काळ धरणाचे दरवाजे अधिक प्रमाणात वर उचलले. पूर्वी धरणाच्या 11 दरवाज्यातून 45 हजार क्यूसेकने विसर्ग सुरू होता.

दरम्यान, रात्रभर पावसाने झोडपून काढल्यानंतर गुरुवारी पहाटे सहा वाजता विसर्ग आठ हजार क्यूसेक इतका वाढविण्यात आला. मुळा पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता सायली पाटील व उपअभियंता शरद कांबळे यांच्या मार्गदर्शनामध्ये मुळातून पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला. पावसाचा जोर सुरूच असल्याचे पाहून सकाळी आठ वाजता 10 हजार क्यूसेकने विसर्ग वाढविण्यात आला. दरम्यान, पावसाच्या पाण्याची आवक वाढतच असल्याने अखेर दुपारी तीन वाजता धरणाच्या दरवाज्यातून 15 हजार क्यूसेक इतका विसर्ग वाढविण्यात आला.

पूर नियंत्रण कक्षातील सर्व अधिकारी व कर्मचारी आवक व विसर्गाचे नियंत्रण साधत आहेत. मुळा धरणातून जायकवाडी धरणाला यंदाच्या वर्षी 22 हजार दलघफू इतके उच्चांकी पाणी सोडले गेले आहे. यंदाच्या हंमागाम मुळा धरणाला 43 हजार दलघफू इतके नव्याने पाणी लाभले.

Back to top button