नाशिकमधील 354 कोटींच्या घंटागाडी ठेक्याचा मार्ग अखेर मोकळा

नाशिकमधील 354 कोटींच्या घंटागाडी ठेक्याचा मार्ग अखेर मोकळा
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

महापालिकेच्या वादग्रस्त ठरलेल्या आणि १७६ काेटींवरून थेट ३५४ काेटींवर उड्डाण घेतलेल्या घंटागाडीच्या नवीन ठेक्याचा मार्ग अखेर मनपा प्रशासनाने मोकळा करून दिला आहे. यामुळे येत्या १ डिसेंबरपासून तब्बल ३९७ घंटागाड्या कचरा संकलनासाठी धावणार आहेत. गेल्या दीड ते दोन महिन्यापासून या ठेक्याची फाईल लालफितीत बंद करून ठेवण्यात आली होती. यामुळे प्रशासनाच्या आणि एकूणच ठेक्यातील गैरकारभारांविषयी शंका उपस्थित केली जात होती.

कचरा संकलनासाठी घंटागाड्याची वेळ आता सकाळी सातएेवजी सहा वाजता करण्यात आली आहे. घंटागाडीच्या जुन्या ठेक्याची मुदत गेल्यावर्षी डिसेंबरमध्येच संपुष्टात आली होती. त्यानंतर आततागायत जुन्याच ठेकेदारांना चाल देण्यात आली. नवीन ठेक्याची प्रक्रिया वादात सापडली होती. तब्बल तीन आयुक्तांनी या ठेक्याशी संबंधित फाईल मागवून वेगवेगळे अर्थ काढत या ठेक्याची तपासणी करून आपले समाधान करून घेतले. आजी-माजी पालकमंत्र्यांनीही घंटागाड्यांबाबत लक्ष घालत विविध सूचना केल्या होत्या. अनेक राजकीय आरोप प्रत्यारोप पार करत आता नवीन घंटागाड्या १ डिसेंबरपासून शहरात धावणार आहेत. नाशिक पश्चिम व सिडकाे विभागासाठी वाॅटरग्रेस, अॅन्थोनी एन्वा कंपनीकडे पंचवटी व सातपुर विभाग, नाशिकराेड विभागाकरता तनिष्क एंटरप्राईजेस तर नाशिक पुर्व विभागासाठी सय्यद असिफ अली या ठेकेदारांना ठेका देण्यात आला असल्याचे घनकचरा व्यवस्थापन विभागाचे संचालक डॉ. आवेश पलोड याांनी सांगितले.

लहान घंटागाड्यांच्या संख्येत वाढ

शहरातील जुने नाशिक, पंचवटी तसेच गावठाण भागात बहुतांश रस्ते चिंचोळे तसेच लहान स्वरूपाचे आहेत. यामुळे या रस्त्यांवरून मोठ्या वाहनांना ये-जा करता येत नाही. त्यामुळे अशा भागातील कचरा संकलन करण्यासाठी ३८ लहान घंटागाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. गल्लीबाेळात जावून या गाड्यांमार्फत कचरा संकलन केले जाऊ शकते.

१२३ घंटागाड्या अतिरिक्त

याआधीच्या ठेक्यासाठी एकूण २७४ घंटागाड्या होत्या. आता नवीन ठेक्यासाठी ३९७ घंटागाड्या आहेत. म्हणजेच १२२ गाड्या अतिरिक्त असतील. हाॅटेल्ससाठी २४, उद्यानासाठी ३३, बांधकाम साहित्य उचलण्यासाठी सहा, व्यावसायिक कचऱ्यासाठी १० तर अन्य सहा गाड्या राखीव ठेवण्यात येणार आहेत. झोपडपट्टीतील कचरा संकलनाकरता ३६ वाहने आहेत.

कचरा संकलनासाठीचा नवीन ठेका १ डिसेंबरपासून सुरू होत आहे. एकूण ३९७ घंटागाड्या असतील. लहान वाहनांमुळे जुने नाशिक व इतर गावठाण भागातील कचरा संकलन होईल. तसेच झोपडपट्टीतील स्वच्छतेकरताही स्वतंत्र गाड्या असतील.

– डॉ. आवेश पलोड, संचालक- घनकचरा व्यवस्थापन विभाग

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news