जळगाव : अवघ्या दहा हजार रुपयांसाठी मित्रानेच केला खून | पुढारी

जळगाव : अवघ्या दहा हजार रुपयांसाठी मित्रानेच केला खून

जळगाव : पुढारी वृत्तसेवा

उधारीचे १० हजार रुपये परत न केल्याच्या कारणातून मित्राचा खून केल्याची कबुली आरोपीने दिली आहे. जळगाव गुन्हे शाखेचे निरीक्षक किसनराव नजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हा उघडकीस आला.

सोमवारी (दि.3) सकाळी ११ च्या सुमारास भादली ते शेळगावदरम्यान पुलानजीकच्या पाटचारीत रस्त्याने जाणार्‍या नागरिकांना युवकाचा मृतदेह आढळला. याबाबत पोलिसांना माहिती देताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. यामध्ये युवकाच्या गळ्यावर व कपाळावर घाव घालण्यात आल्याचे दिसून आले होते. त्यानंतर एलसीबीने तपासचक्र गतिमान करीत अवघ्या तीन दिवसांत गुन्हा उघडकीस आणला. शहरातीलच सौरभ यशवंत चौधरी (३१, रा. दशरथनगर, जळगाव) असे मयत युवकाचे नाव असून, खून प्रकरणी मयताचा मित्र ईश्वर नथ्थू सपकाळे (२५, रा. कानळदा) यास कानळदा शिवारातून अटक करण्यात आली आहे.

दोघांना मद्य आणि गांजाचे होते व्यसन:
मयत सौरभ आणि ईश्वर हे दोघे मित्र असून दोघांना मद्य आणि गांजाचे व्यसन होते. दीड दोन वर्षापूर्वी सौरभने ईश्वरकडे १० हजार उधार मागितले. परंतु ईश्वरकडे पैसे नव्हते. त्यामुळे त्याने परीचयातील एकाकडून मध्यस्थीने पैसे उधार घेऊन दिले होते. परंतु अनेक दिवस होऊनही सौरभ पैसे परत करत नव्हता आणि दुसरीकडे ईश्वरला पैसे देणारेही तगादा लावत होते.
सौरभने ईश्वरलाच मारण्याची दिली धमकी…
सौरभ आणि ईश्वर भादली शिवारातील भादली-कानसवाडा रस्त्यावरील पाटचारीवर पोहचले. याठिकाणी दोघांनी गांजा ओढला. यावेळी ईश्वरने पुन्हा एकदा पैशांचा विषय काढला. त्यावर सौरभने पैसे देणार नाही आणि तू जास्त मागे लागला तर तुला उडवून टाकेल अशी धमकी दिली. ईश्वरला वाटलं खरचं सौरभ आपल्याला मारून टाकेल  काय? त्याने क्षणाचाही विलंब न करता दुचाकीवर शेतात कामासाठी नेलेल्या पिशवीतून रॉड काढून सौरभच्या डोक्यात टाकला. तीन वेळेस डोक्यात रॉड टाकल्यानंतर विळ्याने सौरभवर अंधाधुंद वार करायला सुरुवात केली. तिथून घरी जातांना ईश्वरने असोद्याजवळील त्याच पान टपरीलगत पाण्याच्या नळावर हाथपाय धुतले आणि घरी जाऊन कपडे बदलले. तर दुसर्‍याच दिवसापासून घरातून तो पसार झाला होता.
या पथकाने केला खुनाचा उलगडा…
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किसनराव नजन पाटील यांच्या पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक जालिंदर पळे, उपनिरीक्षक अमोल देवळे, सहायक फौजदार रवी नरवाडे, संजय हिवरकर, राजेश मेढे, जितेंद्र पाटील, लक्ष्मण पाटील, महेश महाजन, अक्रम शेख, संदीप साळवे, रणजीत जाधव, विनोद पाटील, किशोर राठोड, नितीन बाविस्कर, प्रीतम पाटील, ईश्वर पाटील, रमेश जाधव यांनी या खुनाचा उलगडा केला.

हेही वाचा:

Back to top button