भूषणनगरमध्ये चाकूने वार करून चेन लांबविली | पुढारी

भूषणनगरमध्ये चाकूने वार करून चेन लांबविली

नगर : पुढारी वृत्तसेवा : पती-पत्नीला चाकूचा धाक दाखवून गळ्यातील चेन चोरून नेल्याची घटना केडगाव भागातील भूषणनगरमध्ये घडली आहे. यावेळी आरडाओरडा केला असता, एकाने पतीच्या पोटावर चाकूचा वार करून गळ्यातील दीड तोळ्याची सोन्याची चेन हिसकावून नेली. कोतवाली पोलिस ठाण्यात अज्ञात चौघा जणांविरोधात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत कविता संतोष पाटील (वय 42, रा. नवोदय कॉलनी, लिंकरोड, भूषणनगर, केडगाव) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांचे पती संतोष गौतम पाटील (वय 46) हे हल्ल्यात जखमी झाले असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

गुरूवारी (दि.6) पहाटे अडीचच्या सुमारास किचनचा कडीकोयंडा उचकटून चारजण वरच्या मजल्यावरील बेडरूममध्ये शिरले व फिर्यादी यांच्या बेडरूममध्ये येऊन चाकू दाखवून घरातील दागिने काढून देण्यास सांगितले. यावेळी गॅलरीत येऊन फिर्यादी यांनी आरडाओरडा केला असता चोरटे निघून जाऊ लागले. दरम्यान, संतोष पाटील हे त्यांच्या मागे गेेले असता एकाने पोटात चाकू मारून त्यांच्या गळ्यातील दीड तोळे वजनाची (किंमत 45 हजार रुपये) सोन्याची चेन ओढून नेली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर अपर पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांच्या मार्गदर्शनात अधिक तपास रवींद्र पिंगळे करीत आहेत.

Back to top button