नाशिक : एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांना हंगामी बढती  | पुढारी

नाशिक : एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांना हंगामी बढती 

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

राज्यातील विभागीय नियंत्रकपदाच्या सरळसेवा भरतीच्या रिक्त जागी विभागीय वाहतूक अधिकारी व आगार व्यवस्थापक या संवर्गातील अधिकाऱ्यांना हंगामी बढती देण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने घेतला आहे. त्यानुसार राज्यातील सहा अधिकाऱ्यांना बढती मिळाल्याचे परिपत्रक महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी काढले आहे. ही निव्वळ हंगामी बढती असल्याचे महामंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

एसटी महामंडळाचे अकाेला, भंडारा, यवतमाळ, रायगड, लातूर, परभणी आदी विभागीय नियंत्रकपद हे सरळसेवा भरतीतून न भरल्याने रिक्त आहे. आता या सहाही ठिकाणी हंगामी बढतीवर विभागीय नियंत्रकांची नेमणूक करण्यात येणार आहे. निव्वळ हंगामी बढतीमुळे इतरांच्या सेवाज्येष्ठतेला बाधा होणार नाही. तसेच महामंडळाच्या या आदेशामुळे नियुक्त अधिकाऱ्यांना ज्येष्ठता, सलगता किंवा अन्य कोणताही अग्रक्रम याचा हक्क मिळणार नाही. सरळसेवा भरतीच्या उमेदवाराची नेमणूक झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांची हंगामी बढती खंडित होणार असल्याचे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे. नियुक्त अधिकाऱ्यांना निव्वळ हंगामी बढतीवरील नेमणुकीमुळे त्यांच्या विभागात तसेच घटकात बदल होत असल्याने, त्यांना नियमानुसार प्रवास भत्ता, दैनिक भत्ता, पदग्रहण अवधी आदी अनुज्ञेय असल्यास ते देय राहणार आहे. दरम्यान, नियुक्त अधिकाऱ्यांना हंगामी बढतीच्या ठिकाणी रुजू होण्यासाठी संबंधित विभागप्रमुख अथवा घटकप्रमुख यांनी तत्काळ कार्यमुक्त करावे तसेच अधिकाऱ्यांनी हंगामी बढतीचा कार्यभार स्वीकारल्याचा अहवाल महाव्यवस्थापकांकडे पाठविण्याच्या सूचना महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक चन्ने यांनी दिल्या आहेत.

या अधिकाऱ्यांना मिळाली बढती….

नाशिकच्या विभागीय अधिकारी शुभांगी यशवंत शिरसाठ यांची अकाेला विभागीय नियंत्रकपदी बदली झाली. नागपूरच्या विभागीय वाहतूक अधिकारी तनुजा अहिरकर यांच्याकडे भंडारा विभागीय नियंत्रकपदाची धुरा सोपविण्यात आली आहे. बारामतीचे आगार व्यवस्थापक अमोल गोंजारी यांना यवतमाळच्या विभागीय नियंत्रकपदी निव्वळ हंगामी बढती देण्यात आली आहे. पुण्याचे विभागीय अधिकारी दीपक घोडे यांच्याकडे रायगड विभागीय नियंत्रकांची जबाबदारी देण्यात आली आहे. उस्मानाबादचे विभागीय वाहतूक अधिकारी अश्वजित जानराव यांची लातूरच्या विभागीय नियंत्रकपदी बदली झाली. किनवट आगारप्रमुख सचिन डफळे यांची परभणी विभागीय नियंत्रकपदी हंगामी बढती झाली आहे.

हेही वाचा:

Back to top button