बारामती : अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा निर्माण करणार: विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे प्रतिपादन | पुढारी

बारामती : अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा निर्माण करणार: विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे प्रतिपादन

बारामती; पुढारी वृत्तसेवा: ‘शहराचा वेगाने विकास होत असताना वैद्यकीय सुविधांच्या बाबतीतही बारामती मागे राहिलेले नाही. यापुढील काळात कोणत्याही रुग्णाला गंभीर आजारासाठी पुणे-मुंबईला जावे लागू नये, याची खबरदारी घेतली जात आहे. तशा पद्धतीच्या वैद्यकीय सुविधा येथे निर्माण करण्यावर भर दिला जात आहे,’ अशी माहिती राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिली. येथील डॉ. महेश व डॉ. अपर्णा काटे यांच्या नूतनीकृत कृष्णदृष्टी स्पेशालिटी नेत्र रुग्णालयाच्या अ‍ॅडव्हान्स मायक्रो फेको व लेझर सेंटरचे उद्घाटन अजित पवार यांच्या हस्ते विजयादशमीला बुधवारी (दि. 5) पार पडले.

या वेळी ते बोलत होते. सोलापूरचे प्रसिद्ध विधिज्ञ अ‍ॅड. धनंजय माने, माजी आमदार रामहरी रूपनवर, पौर्णिमा तावरे, किरण गुजर, सचिन सातव, संभाजी होळकर, डॉ. अशोक तांबे, डॉ. रमेश भोईटे, डॉ. विभावरी सोळुंके, विश्वास देवकाते, प्रशांत काटे, बाळासाहेब तावरे यांच्यासह अनेक मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते. पवार म्हणाले, की बारामतीत डॉ. काटे दांपत्याने उपलब्ध करून दिलेल्या अत्याधुनिक सुविधांचा रुग्णांना मोठा फायदा होणार आहे. मोतीबिंदू शस्त्रक्रियेनंतर डोळ्यांचा नंबर पूर्णतः जाऊ शकतो, हे विशेष उल्लेखनीय.

बारामतीतील कृष्णदृष्टी हॉस्पिटल गेली 22 वर्षे रुग्ण सेवेत कार्यरत आहे. येथे अनेक अ‍ॅडव्हान्स मशिन्सचा वापर करून डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया करण्याची सुविधा बारामती येथे उपलब्ध करून देत आहे. जागतिक दर्जाच्या मोतीबिंदू, काचबिंदू व रेटिना उपचाराकरिता वापरले जाणारे तंत्रज्ञान बारामतीत उपलबध करीत कृष्णदृष्टी नेत्र रुग्णालय आता आधुनिक स्वरूपात रुग्णांच्या सेवेत रुजू झाले असल्याचे डॉ. महेश काटे यांनी सांगितले.

प्रास्ताविकात डॉ. अपर्णा काटे-भोसले यांनी डॉ. तात्याराव लहाने, डॉ. जयप्रकाश भोसले, सातार्‍याच्या माजी नगराध्यक्ष आशाताई भोसले यांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त केली. बारामतीत अत्याधुनिक सुविधा देत असून, त्याचा रुग्णांना उपयोग होईल, असा विश्वास व्यक्त केला.

Back to top button