सोमेश्वर करणार 15 लाख टन उसाचे गाळप : पुरुषोत्तम जगताप | पुढारी

सोमेश्वर करणार 15 लाख टन उसाचे गाळप : पुरुषोत्तम जगताप

सोमेश्वरनगर; पुढारी वृत्तसेवा: गाळप हंगामासाठी सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यातील सर्व यंत्रणा सज्ज आहे. सभासद, संचालक, कामगार, वाहतूकदार यांच्या सहकार्याने गाळप हंगाम यशस्वी पार पाडू. यंदाच्या गळीत हंगामात सोमेश्वर 15 लाख टन उसाचे गाळप करणार आहे. यासंदर्भात ऊस तोडणी कामगार व वाहतूकदार यांच्याशी करार झाले आहेत. शासनाच्या निर्णयानुसार 15 ऑक्टोबरपासून ऊस गाळप हंगाम सुरू करण्याचा संचालक मंडळाचा मानस असल्याचे सोमेश्वरचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी सांगितले.

सोमेश्वर कारखान्याच्या 61 व्या गळीत हंगामाचे बॉयलर अग्निप्रदीपन दसर्‍याच्या मुहूर्तावर बुधवारी (दि. 5) अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप व रोहिणी जगताप तसेच उपाध्यक्ष आनंदकुमार होळकर व मनीषा होळकर या उभयतांच्या हस्ते पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. जगताप म्हणाले, कारखान्याकडे 40 हजार 788 एकर उसाची नोंदणी झाली आहे. हंगामासाठी सर्व करार पूर्ण झाले असून 436 ट्रक- ट्रॅक्टर, 860 बैलगाडी, 269 डंपींग आणि 13 हार्वेस्टरच्या माध्यमातून वेळेत गाळप करू, असे जगताप यांनी सांगितले. सोमेश्वर कारखाना दराच्या बाबतीतही अग्रेसर राहण्यासाठी कुठेही कमी पडणार नसल्याचे जगताप यांनी सांगितले.

यावेळी माजी अध्यक्ष शहाजीराव काकडे, कामगार संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब काकडे, ज्येष्ठ सभासद नारायण निगडे, सुरेश जेधे, मोहन जगताप, विजय काकडे, हिंदूराव काकडे, कार्यकारी संचालक राजेंद्र यादव, संचालक राजवर्धन शिंदे, संग्राम सोरटे यांच्यासह सचिव कालिदास निकम, शेतकी अधिकारी बापूराव गायकवाड, सभासद कामगार, मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Back to top button