नाशिक : भरधाव कारने घेतली १०० मीटरची जम्प; महिलेचा जागीच मृत्यू

नाशिक : डहाळेवाडी येथे १०० मिटरपर्यंत दूर जाऊन भात शेताच्या आवणामध्ये कोसळलेली कार. (छाया: तुकाराम रोकडे)
नाशिक : डहाळेवाडी येथे १०० मिटरपर्यंत दूर जाऊन भात शेताच्या आवणामध्ये कोसळलेली कार. (छाया: तुकाराम रोकडे)
नाशिक (देवगाव): पुढारी वृत्तसेवा
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील डहाळेवाडी- ढुबेवाडी दरम्यान नाशिकहून भरधाव वाडा – वसईकडे मार्गक्रमण करत असलेली ह्युंडाई ( एम एच ४८ बी एच ९९०२) पलटी झाल्याने कारमध्ये असलेली महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे.
मंगळवारी (दि. २०) सायंकाळी साडेसहाच्या दरम्यान पार्वती सदाशिव जाधव (४८) नाशिकहून त्र्यंबकेश्वरमार्गे वसईकडे कारने प्रवास करत होत्या. मात्र, सायंकाळी सुरू असलेला रिमझिम पाऊस आणि गडद धुक्यामुळे धोकादायक वळणाचा अंदाज न आल्याने भरधाव  असलेल्या वाहनावर नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या कडेला असलेल्या भल्या मोठ्या दगडाला कारने धडक दिली. यामध्ये कार जम्प घेत १०० मिटरपर्यंत दूर जाऊन भात शेताच्या आवणामध्ये कोसळली. यात पार्वती यांचा जागीच मृत्यू झाला. आकस्मिक अपघाताची नोंद घोटी पोलीस ठाण्यात केली असून महिलेचा मृतदेह पुढील प्रक्रियेसाठी नाशिक जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आल्याचे डहाळेवाडी येथील पोलीस पाटील शांताराम डहाळे यांनी सांगितले.
नागमोडी वळणावर फलकच नाही
त्र्यंबकेश्वर- देवगांव या मार्गावर अनेक नागमोडी व धोकादायक वळणे आहेत. त्यात पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात दाट धुके असल्यामुळे धोकादायक वळणाचा अंदाज येत नाही. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने धोकादायक वळणावर धोकादायक सूचना दर्शवणाऱ्या फलकांचे फलक लावणे व स्टीलचे कठडे बसविणे गरजेचे आहे.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news