नाशिक : सिन्नरला ‘सरस्वती’च्या पुराचा तडाखा; 140 दुकाने, 165 घरांचे अतोनात नुकसान | पुढारी

नाशिक : सिन्नरला ‘सरस्वती’च्या पुराचा तडाखा; 140 दुकाने, 165 घरांचे अतोनात नुकसान

सिन्नर : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा
सिन्नर शहर व परिसरात झालेल्या ढगफुटीसद़ृश पावसाने गुरुवारी (दि.1) रात्री हाहाकार माजवला. त्यात शहराच्या मधोमध वाहणार्‍या सरस्वती नदीला महापूर आला. परिणामी नदीलगतची दुकाने व झोपडपट्टीवासीयांना मोठा तडाखा बसला. शहरातील सुमारे 140 दुकाने व 165 घरांचे अतोनात नुकसान झाले. त्यामुळे सुमारे सहा कोटींचा फटका बसला असावा, असा अंदाज नगर परिषद प्रशासनाने व्यक्त केला आहे.

बुधवारी रात्रभर मुसळधार पाऊस झाल्यानंतर गुरुवारी सायंकाळी सहाच्या सुमारास पुन्हा मुसळधार पावसाला सुरुवात झाली. पावसाचा जोर वाढल्याने तळ्यातील भैरवनाथ मंदिर परिसरातील बंधार्‍यात पाण्याची मोठी आवक झाली. बंधार्‍याच्या भरावावर दाब आल्याने मोठा अनर्थ घडण्याची शक्यता लक्षात घेऊन स्थानिकांनी सांडवा फोडून पाण्याची वाट मोकळी केली. त्यातून मोठ्या प्रमाणात पाणी सरस्वती नदीच्या पात्रात आले. परिणामी नदीला पूर आला.

खासदार पूल, नवा पूल व पडकी वेस येथील पूल पाण्याखाली गेले. मात्र महापूर येऊन धोका निर्माण होईल याची पुसटशी कल्पना नसल्याने पाऊस सुरू झाल्यानंतर बहुतांश दुकानदार दुकानांमध्ये थांबून होते. नागरिकही आपापल्या कामांसाठी घराबाहेर पडलेले होते. नदीच्या पाण्याने धोक्याची पातळी ओलांडली. त्यावेळी नागरिकांना आपण पुराच्या पाण्यात अडकलो असल्याची जाणीव झाली. तोपर्यंत रात्रीचे साडेआठ वाजले होते. मुसळधार पावसामुळे वीजपुरवठा खंडित करण्यात आला. पोलिस ठाणे, नगर परिषद प्रशासन, अग्निशमन दलाचे कर्मचारी मदतीसाठी धावले. स्थानिक नागरिकांनीही आपापल्यापरीने पुरात अडकलेल्यांसाठी बचावकार्य सुरू केले होते. माजी आमदार राजाभाऊ वाजे, माजी नगरसेवक सोमनाथ पावसे यांच्यासह कार्यकर्त्यांनी खासदार पूल परिसरात अडकलेले दुकानदार, भाजीविक्रेते यांना जेसीबीच्या मदतीने सुरक्षित हलविले. मातोश्री नर्मदा लॉन्स येथे जवळपास शंभर लोकांची राहण्याची व जेवणाची व्यवस्था करण्यात आली. आयटीआय परिसरातील छत्रपती संभाजीनगर भागात जवळपास 30 नागरिक अडकलेले होते. त्यांना मुख्याधिकारी संजय केदार, माजी नगराध्यक्ष विठ्ठल उगले, उमेश गायकवाड यांच्यासह कार्यकर्त्यांनी सुरक्षितस्थळी हलविले. त्यांची आयटीआय परिसरातील देवी मंदिरात राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती. अग्निशमन दलाचे कर्मचारी लाला वाल्मिकी, जयेश बोरसे, लक्ष्मण सोनकुसरे आदींनी तसेच प्रभारी तहसीलदार सागर मुंदडा, पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्यासह त्यांच्या सहकार्‍यांनी पहाटेपर्यंत मदतकार्य करतानाच परिस्थितीवर लक्ष ठेवले.

अन् नागरिकांच्या काळजाचा ठोकाच चुकला :

पुराच्या वेढ्यात अडकले असले तरी दुकानदार दुकानातच उंच वस्तूंवर चढून बसले होते. मात्र, रात्री पावणेसातच्या सुमारास पावसाचा जोर वाढल्याने येथील प्रतिष्ठित व्यापारी अभिषेक बोरा पत्नी व मुलासह चारचाकी वाहनाने पावसात अडकलेल्या मुलीला घ्यायला गेले. नवा पूल येथेच त्यांच्या चारचाकीला पुराचा वेढा बसला. त्यामुळे त्यांनी गाडीबाहेर पडून दुकानांचा आसरा घेतला. या भागात पंधरा ते वीस नागरिक अडकलेले होते. त्यात मुलांचाही समावेश होता. सर्वांच्याच काळजाचा ठोका चुकला. गळ्यापर्यंतच्या पाण्यात ते अडकले. पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे, माजी नगरसेवक प्रमोद चोथवे यांच्यासह नागरिक त्यांना धीर देत होते.

तीन चारचाकींसह अनेक दुचाकींना जलसमाधी :

परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागल्यानंतर नागरिकांनी दुचाकी, चारचाकी वाहने, दुकानांतील माल सोडून जीव वाचवण्याला प्राधान्य दिले. त्यानंतर पुराच्या तडाख्यात अनेक दुचाकी वाहून गेल्या. पुलावरील अनेक टपर्‍या, हातगाडे क्षणार्धात पुराच्या पाण्यात दिसेनासे झाले.

सिन्नरमधील नुकसानीचे पंचनामे करा
नाशिक : सिन्नर शहर व परिसरात गुरुवारी (दि.1) मध्यरात्री झालेल्या ढगफुटीसदृश पावसामुळे सरस्वती नदीला पूर आला. त्यामुळे दुकाने व घरांमध्ये पाणी शिरून नागरिकांचे मोठे प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त भागांचे तत्काळ पंचनामे करावेत, असे आदेश जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी तहसीलदारांना दिले आहेत. सिन्नरमध्ये गुरुवारी (दि.1) ढगफुटीसदृश पाऊस झाला. अवघ्या काही तासांमध्ये तब्बल 165 मिमी पावसाची नोंद करण्यात आली. त्यामुळे शहरातून वाहणार्‍या सरस्वती नदीला पूर आला. पुराचे पाणी शहरातील घरे आणि दुकानांमध्ये शिरल्याने स्थानिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. परिणामी सिन्नरकरांनी रात्र जागून काढली. सरस्वती नदीच्या पुराचे पाणी अनेक ठिकाणी बेसमेंटमधील दुकानांमध्ये गेल्याने व्यापार्‍यांचे हाल झाले आहेत. दरम्यान, नुकसानग्रस्त भागांमधील पंचनाम्यांची कामे तातडीने हाती घेण्याचे आदेश जिल्हाधिकार्‍यांनी स्थानिक प्रशासनाला दिले आहेत. पंचनामे पूर्ण झाल्यानंतर प्रशासन शासनाकडे मदतीसाठीचा प्रस्ताव पाठविणार आहे.

हेही वाचा :

Back to top button