पुणे : ‘विमान उद्योगाला चालना मिळेल’: केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे | पुढारी

पुणे : ‘विमान उद्योगाला चालना मिळेल’: केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे

पुणे; पुढारी वृत्तसेवा: ‘देशात हवाई वाहतुकीची प्रचंड क्षमता आहे. देशात 9 फ्लाइंग ट्रेनिंग स्कूल्स सुरू केल्या आहेत, त्यामुळे प्रशिक्षणाची सुविधा वाढली आहे. एव्हिएशन टर्बाइन इंधनावर व्हॅट कमी करण्यासाठी सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. यामुळे विमान वाहतूक उद्योगाला नक्कीच चालना मिळेल,’ असा विश्वास केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी व्यक्त केला.

आयसीसी ट्रेड टॉवर येथे मराठा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अ‍ॅग्रिकल्चरच्या वतीने आयोजित कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार गिरीश बापट, मराठा चेंबर ऑफ कॉमर्सचे सुधीर मेहता, प्रशांत गिरबाने आदी उपस्थित होते.  शिंदे म्हणाले, ‘पुणे शहरात उद्योग तसेच बाजारपेठेसाठी पोषक वातावरण असल्याने उद्योगवाढीसाठी तसेच उद्योगासंबंधी प्रश्नांच्या सोडवणुकीसोबतच पुण्याच्या विकासासाठी आपले कायम सहकार्य असणार आहे.’

बालपणापासून आपले पुणे महानगराशी वेगळे नाते असल्याचा उल्लेखही त्यांनी केला. पाटील म्हणाले, चांदणी चौकातील वाहतूक कोंडीची समस्या गतीने सोडविण्यासोबतच रिंगरोड, विमानतळ तसेच उद्योग क्षेत्रातील महत्त्वाच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी राज्य शासनाकडून सहकार्य करण्यात येईल. रिंगरोडसाठी भूसंपादन प्रक्रिया पूर्णत्वास येत असून, या मार्गामुळे शहरातील वाहतूक सुरळीत होईल. या संपूर्ण प्रक्रियेतील खर्चासाठी राज्य सरकार योगदान देईल, असेही त्यांनी सांगितले. प्रास्ताविक गिरबाने यांनी केले. उद्योग क्षेत्रातील प्रगतीबाबत त्यांनी माहिती दिली. या वेळी विविध क्षेत्रातील उद्योजक उपस्थित होते.

 

Back to top button