पुण्यातून लवकरच सिंगापूर, बँंकॉकला विमानसेवा: ज्योतिरादित्य शिंदे यांची ग्वाही | पुढारी

पुण्यातून लवकरच सिंगापूर, बँंकॉकला विमानसेवा: ज्योतिरादित्य शिंदे यांची ग्वाही

पुणे; पुढारी वृत्तसेवा: पुणे शहरातून लवकरच सिंगापूर, बँकॉक व कतारमधील दोहा येथे आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू करण्यात येईल. तसेच जर्मनी, अमेरिका अन् इंग्लंडमध्येही या शहरातून जाता येईल. त्याबाबत विचार सुरू आहे. तसेच पुणे विमानतळाच्या धावपट्टीचाही लवकरच विस्तार करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय नागरी विमान वाहतूकमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी शुक्रवारी पुणे येथे दिली.
मराठा चेंबर ऑफ कॉमर्सच्या वतीने केंद्रीय मंत्री शिंदे यांच्या वार्तालापाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. नागरी विमान वाहतूक मंत्री झाल्यावर ते प्रथमच शहरात आल्याने शहरातील उद्योजकांनी आपली समस्या चेंबरच्या माध्यमातून त्यांच्या समोर मांडल्या.

पुणे शहर जगाशी जोडणार..
शिंदे म्हणाले, पुणे शहरात देशाची आर्थिक राजधानी होण्याची ताकद आहे. त्यामुळे ते जगाशी जोडले जाणे गरजेचे आहे. येथून फक्त दुबईला जाण्यासाठी सोय आहे. याचे मला आश्चर्य वाटले. त्यामुळे पुणेकरांच्या सर्व मागण्या मी पूर्ण करणार आहे. येथून लवकरच सिंगापूर, बँकॉक, दोहा या ठिकाणी आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू करण्यात येईल. तसेच जर्मनी, अमेरिका, इंग्लंडशीदेखील पुणे शहर विमान सेवेच्या माध्यमातून जोडण्याचा विचार सुरू आहे.

धावपट्टीचे काम पूर्ण होणार
पुणे विमानतळ हे लष्करी विमानतळ आहे, त्यामुळे त्यांची परवानगी घेतल्याशिवाय काही कामे अपूर्ण होती. यातच धावपट्टीचा मुद्दा आहे. येथील धावपट्टी 2 हजार 35 मीटर लांब आहे. ती पूर्वेकडून 900 मीटर व पश्चिमेकडून 200 मीटर वाढविण्यात येणार आहे. तसेच कार्गोचे कामही मार्गी लागणार असून, सध्या 25 हजार मेट्रिक टनची क्षमता आहे ती वाढवून 42 हजार मेट्रिक टन इतकी क्षमता केली जाणार आहे.

शिंदे यांचा मराठी बाणा..
ज्योतिरादित्य यांचे इंग्रजी, हिंदी भाषेवर प्रभुत्व असल्याने पत्रकारांनी त्यांना इंग्रजीत प्रश्न विचारण्यास सुरुवात केली, मात्र त्यांनी थेट मराठीत संवाद साधला व पत्रकारांना म्हणाले, मराठी येते. तुम्हीही मराठीतच बोला. तसेच या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उद्योजक प्रशांत गिरबाने हे करीत होते. त्यांना ही ते म्हणाले की, मराठीतच बोला. तेव्हा टाळ्यांचा कडकडाट झाला.

विमानतळ 200 पार नेणार..
शिंदे म्हणाले, देशात 2012 पर्यंत फक्त 74 विमानतळे हेाती. 2022 मध्ये तो आकडा 140 पर्यंत गेला आहे. ‘स्वातंत्र्यचा अमृतमहोत्सव साजरा करताना मला हा आकडा सांगताना आनंद होत आहे. 2028 पर्यंत हा आकडा 200 पार नेण्याचा संकल्प आहे.

 

Back to top button