नाशिक : कंटनेर चालकाची शक्कल ! 16 लाखांच्या वाटाण्याची विक्री करून झाला फरार

नाशिक : कंटनेर चालकाची शक्कल ! 16 लाखांच्या वाटाण्याची विक्री करून झाला फरार

नाशिक (इगतपुरी/घोटी) : पुढारी वृत्तसेवा
उत्तर प्रदेशातील मोहबा येथून वाशी (मुंबई) येथे पोहोचवण्यासाठी दिलेल्या 817 वाटाण्याच्या गोण्यांची कंटेनर चालकाने परस्पर विल्हेवाट लावली आहे. मुंबई-आग्रा महामार्गावर मालेगाव ते घोटी दरम्यान ही चोरीची घटना घडली आहे. संपूर्ण वाटाण्याची किंमत 16 लाख 48 हजार 843 रुपये एवढी आहे. चालकाने हुशारी दाखवत कंटेनरची जीपीएस सिस्टम मालेगाव येथे बंद केली आणि रिकामा कंटेनर घोटी येथे बेवारस सोडून पोबारा केल्याचे समोर आले.

न्यू गुडविल फ्राट करिअर वाशी या फर्मचे मालक अरुण कुमार यादव यांनी घोटी पोलिस ठाण्यात कंटेनर चालकाविरोधात फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अरुणकुमार यादव (33, धंदा ट्रान्स्पोर्ट, रा. एमबीएन पार्क, प्लॅट नं. 5354, ऑफीस नं. 211, सेक्टर 19 ए, वाशी, नवी मुंबई) यांनी त्यांच्या कंटेनरवरील (एनएल 01 एबी 7851) संशयित आरोपी चालक संजय कुमार रामबच्चन यादव (रा. बिरमपूर, पो. मुक्तीगंज, ता. केरावत, जि. जौनपूर, उत्तर प्रदेश) याच्या ताब्यातील कंटेनरमध्ये आंबे ट्रेडर्स, मोहबा उत्तर प्रदेश येथून 817 वाटाण्याच्या गोण्या भरून वाशी येथे खाली करण्यासाठी विश्वासाने ताब्यात दिला होता.

घोटीचे सहायक पोलिस निरीक्षक दिलीप खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक संजय कवडे, हवालदार शीतल गायकवाड, प्रसाद दराडे, संतोष दोंदे, झाल्टे, राहुल साळवी, मारुती बोराडे, रविराज जगताप, शरद कोठुळे, संदीप दुनबळे पुढील तपास करीत आहेत.

मालेगावात जीपीएस सिस्टीम केली बंद
या चालकाने मालेगाव येथे कंटेनरचे जीपीएस बंद करून मालेगाव ते घोटीदरम्यान कोठेतरी वाटाण्याच्या 817 गोण्यांची विल्हेवाट लावली. कंटेनर घोटी येथील वैतरणा फाटा येथे रिकामा उभा करून पळून गेला.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news