धुळ्यात शिवज्योत मशाल यात्रेचे जल्लोषात स्वागत | पुढारी

धुळ्यात शिवज्योत मशाल यात्रेचे जल्लोषात स्वागत

धुळे : पुढारी वृत्तसेवा

छत्रपती शिवाजी महाराज औरंगजेबाच्या नजर कैदेतून निसटल्याच्या घटनेस यावर्षी 356 वर्ष पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने गरुड झेप मोहिमेअंतर्गत आग्रा ते राजगड दरम्यान शिवज्योत मशाल यात्रा काढण्यात येत आहे. या मशाल यात्रेचे आज धुळ्यात स्वागत करण्यात आले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याला उजाळा देण्यात आला.

छत्रपती शिवाजी महाराज आग्रा येथे ९९ दिवस कैदेत होते. ते १७ ऑगस्ट १६६६ रोजी औरंगजेबाच्या नजरकैदेतून निसटले. १३ दिवसात महाराज राजगडावर सुखरूप पोहचले. या घटनेला यावर्षी ३५६ वर्ष पूर्ण होत आहेत. या निमित्ताने गरूडझेप मोहिमे अंतर्गत काढण्यात आलेल्या “आग्रा ते राजगड” या शिवज्योत मशाल यात्रेचे आज धुळ्यात आगमन झाल्यावर अनेक मान्यवरांच्या प्रमुख उपस्थित मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले.

या शिवज्योत मशाल यात्रेचे नेतृत्व छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायदळ सैन्याचे प्रमुख पिलाजीराव गोळे यांचे १३ वे वंशज अॅड. मारोती आबा गोळे हे करीत असून त्यांच्या सोबत असलेले एकुण ३०० मावळे ही मशाल घेऊन दररोज कैक किमी पायी धावत चालत आहेत. दि. १७ ऑगस्ट रोजी आग्राहून निघालेली ही ज्योत दि. २९ ऑगस्ट रोजी राजगडावर पोहचून छत्रपती शिवरायांच्या स्मृतींना अभिवादन करणार आहे. या शिवज्योत मशाल यात्रेचे धुळ्याच्या नगांवबारी परीसरातील केशरानंद गार्डन येथे आज आगमन झाले. या प्रसंगी धुळ्याचे माजी आमदार तथा धुळे जिल्हा बँकेचे अध्यक्ष राजवर्धन कदमबांडे, प्रथम महापौर भगवान करनकाळ, जि.प.सदस्य ज्ञानेश्वर भामरे, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अतुल सोनवणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रणजित भोसले, ज्येष्ठ समाजसेवक सुधाकर बेंद्रे, गुलाबराव पाटील यांनी मशाल यात्रेचे प्रमुख अॅड. मारोतीआबा गोळे यांच्या सह त्यांच्या सोबत असणाऱ्या सर्वांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. या स्वागताच्या कार्यक्रमानंतर मान्यवरांनी आपल्या मनोगतातून या ऐतिहासिक उपक्रमाचे कौतुक केले.

या मशाल यात्रेच्या संपूर्ण स्वागताची जबाबदारी धुळे जिल्हा मराठा क्रांती मोर्चाच्या व सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी पार पाडली. या पदयात्रेचे मध्यप्रदेश ते मालेगांव नियोजन प्रितेश ठाकूर हे करीत आहेत. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचलन मराठा क्रांती मोर्चाचे सचिव निंबा मराठे यांनी तर आभार प्रर्दशन क्रांती मोर्चाचे कार्याध्यक्ष प्रदिप जाधव यांनी केले. यानंतर या मशाल रॅलीची मिरवणूक आग्रारोडने निघून पुढे गावातील वीर महाराणा प्रताप यांच्या पुतळ्यास तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमास मराठा क्रांती मोर्चाचे मार्गदर्शक साहेबराव देसाई, डॉ. संजय पाटील, भाजपचे संजय बोरसे, शिवसेनेचे महानगरप्रमुख धिरज पाटील, शहर संघटक ललीत माळी, नगरसेवक राजेश पवार, राजू बोरसे, रावसाहेब मंडाले, लहु पाटील, संदीप पाटोळे, विजय देवकर, विकास बाबर, श्रीरंग जाधव, राजेंद्र इंगळे, ज्ञानेश्वर पाटील, सहखजिनदार विरेंद्र मोरे, विनोद जगताप, रविंद्र शिंदे, दिपक रौंदळ, अमोल मराठे, हेमंत भडक, अमर फरताडे, हेमंत मराठे आदींसह मोठ्या संखेने उपस्थित होते.

हेही वाचा :

Back to top button